घेतला पुढाकार... वाट्याला आला बहिष्कार!--लोकमत विशेष
By Admin | Updated: February 19, 2015 23:44 IST2015-02-19T22:23:28+5:302015-02-19T23:44:56+5:30
मरडमुऱ्यात मानापमान नाट्य : मंडळाच्या परवानगीशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कुटुंबाला टाकले वाळीत

घेतला पुढाकार... वाट्याला आला बहिष्कार!--लोकमत विशेष
राजीव मुळये -सातारा -गावातील तरुणांच्या मंडळाला न विचारता गावच्या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संबंधिताच्या कुटुंबाला गावाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार जावली तालुक्यातील मरडमुरे गावात घडल्याचे समोर आले आहे. या ‘गुन्ह्या’बद्दल या कुटुंबाला दंडही ठोठावण्यात आला असून, या कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली आहे.वाळीत टाकण्यासारख्या अनिष्ट रूढीचे आपण बळी ठरलो असल्याची तक्रार तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांनी केली आहे. दरवर्षी रामनवमीला गावची यात्रा असते. आढाव यांचा मुलगा सुनील याने गेल्या वर्षी यात्रेनिमित्त गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. गावचे सरपंच आणि शिवशक्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारता, परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वाद झाला होता. तेव्हापासूनच आपल्याला वाळीत टाकले असून, गावातील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास आपल्याला बोलावले जात नाही, असे आढाव दाम्पत्याचे म्हणणे आहे. मंडळाचे बहुतांश तरुण पदाधिकारी मुंबईत असतात. तेथूनच ते आढाव कुटुंबीयांना कोणत्याही कार्यक्रमास बोलावू नका, असे ग्रामस्थांना सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यात्रेत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे या कुटुंबाला सांगण्यात आले आणि तडजोड करून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मात्र, दंड भरूनही हळदी-कुंकू समारंभ, लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही, असे आढाव यांचे म्हणणे आहे. बचत गटाच्या बैठकीहून परतताना आपणास झालेल्या शिवीगाळीबाबत सरपंचांकडे तक्रार केल्यावर ‘मीटिंग घेऊ’ असे सांगितले गेले; मात्र मीटिंग झालीच नाही, अशी रंजना आढाव यांची तक्रार आहे. गावचे सरपंच भिकू जानू मर्ढेकर असा प्रकार घडल्याचे मान्य करतात; मात्र वादावादीतून हे घडल्याचे सांगताना गावकारभाऱ्यांपेक्षा मुंबईकरांचीच ‘सत्ता’ गावात चालते, याचीही नकळत कबुली देतात.‘जातपंचायतीला मूठमाती’ या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमात पुढाकार असणारे नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. त्यांनी सातारच्या कार्यकर्त्यांना लक्ष घालण्यास सांगितले.
त्यानुसार जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार, कार्यकर्ते शंकर कणसे, हातगेघरचे प्रताप सपकाळ आणि रहिमतपूरचे उत्तम धोनकर यांनी आढाव दाम्पत्याची भेट घेतली आणि गुरुवारपासून याप्रश्नी तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना सुरुवातही केली.
मरडमुरे या गावातील आढाव कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे, हे मान्य; पण मरडमुरे गावातला कार्यक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता आयोजित केल्यानंतर झालेल्या वादावादीतून हे घडले आहे. या कुटुंबाकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकावे लागते. त्यांची मीटिंग आणि निर्णयही मुंबईत होत असतात.
- भिकू जानू मर्ढेकर,
सरपंच, मरडमुरा, ता. जावली
१८ महिने लोटले... वीण घट्टच!
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रदूत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला शुक्रवारी १८ महिने पूर्ण होत आहेत. या काळात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत १०७ गुन्ह्यांची नोंद राज्यभरात झाली आहे. डॉक्टरांसारखाच हल्ला भाकप नेते गोविंद पानसरे यांच्यावर नुकताच झालेला असताना कार्यकर्ते मात्र भीती झुगारून, ध्येयाने प्रेरित होऊन विवेकाच्या रस्त्याने मार्गक्रमण करीतच आहेत. तसेच ‘अंनिस’ कार्यकर्त्यांचे राज्य पातळीवरील संघटन आणि त्यांच्यातील ताळमेळ याची प्रचीती मरडमुरा घटनेमुळे आली आहे.
मरडमुरा येथील शिवशक्ती विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र राजाराम मर्ढेकर आणि पदाधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला आहे. ते येत्या शनिवारी भेटायला येणार आहेत. गावचे पोलीस पाटील आणि सरपंचांच्याही संपर्कात आम्ही आहोत. लवकरच याप्रश्नी तोडगा निघेल आणि बहिष्कृत कुटुंबाला गावात आनंदाने राहता येईल, अशी खात्री आहे.
- प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
लोकमत विशेष