दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घ्यावा!
By Admin | Updated: January 6, 2016 01:43 IST2016-01-06T01:43:34+5:302016-01-06T01:43:34+5:30
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे.

दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घ्यावा!
मुंबई : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे. जैन समाजानेही दुष्काळात जनावरांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा यात्रा ३००’ या कार्यक्रमांतर्गत आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांच्या ३०० व्या ‘मारुं भारत, सारुं भारत’ पुस्तकासह ५ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांना आपण पहिल्यांदा औरंगाबादमध्ये भेटलो होतो. तेव्हा आपण त्यांना महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांना शब्द दिल्यानंतर राज्य शासनाने पहिल्या महिन्यातच राज्यात गोवंश हत्या बंदी लागू केली.’
‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांनी जीवन कसे जगावे याचा बहुमूल्य संदेश दिला आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी केवळ धर्माचीच नाही, तर मानवतेची आणि देशाची सेवा केली आहे, म्हणूनच रत्नसुंदरसुरीश्वरजी हे राष्ट्रीय संत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भौतिक सुखाच्या पुढे जाऊन जीवनात आपल्याला उच्चतम मूल्य कसे मिळेल, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी आध्यात्मिक शक्ती महत्त्वाची आहे,’ असेही ते म्हणाले.