स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श घ्यावा

By Admin | Updated: April 30, 2016 02:44 IST2016-04-30T02:44:47+5:302016-04-30T02:44:47+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात फिरले मात्र कोकणासारखी स्वच्छता मी कुठेही पाहिली नाही, स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श साऱ्या महाराष्ट्राने घ्यावा

Take the ideal of Konkan in cleanliness | स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श घ्यावा

स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श घ्यावा

महाड : संपूर्ण महाराष्ट्रात फिरले मात्र कोकणासारखी स्वच्छता मी कुठेही पाहिली नाही, स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श साऱ्या महाराष्ट्राने घ्यावा, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महिला बचत गटांना यापुढे शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करून महिला सबलीकरण व महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल शासनातर्फे उचलले जाणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. महाड पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ग्रामविकास व वित्तराज्य मंत्री दीपक केसरकर, आ. भरत गोगावले, जि.प. बांधकाम सभापती चित्रा पाटील, पं. स. सभापती दीप्ती फळसकर, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील वास्तूचे उद्घाटन करण्याची संधी आपल्याला लाभली हे माझे भाग्य आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जनता सध्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असताना राज्य शासनाच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मागील सरकारने सत्तर हजार कोटी रु. सिंचनावर खर्च करुनही कुठेही सिंचन झाले नाही, मात्र केवळ सोळाशे कोटी रु. खर्चून जलसंधारणाची कामे यशस्वीपणे करून त्या - त्या ठिकाणच्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तुमची नियत, ताकद चांगली असेल तर कोणतेही काम तडीस नेवू शकतो हे यावरून सिध्द होते, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संपूर्ण महाराष्ट्रात तीस हजार किमीचे रस्ते पूर्ण करण्याचे शासनाचे लक्ष्य असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त करून महाड तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. ना. दीपक केसरकर यांनी ग्रामीण भागातील विकास हाच शासनाचा ध्यास असून येत्या तीन चार वर्षात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कायापालट झालेला आपल्याला दिसून येईल अशा प्रकारची धोरणात्मक कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगून महाड तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आ. भरत गोगावले, सभापती दीप्ती फळसकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी उपसभापती प्रीती कालगुडे, गटविकास अधिकारी संघरत्ना खिलारे , सहाय्यक गटविकास अधिकारी शुभांगी नारवले, जि.प. विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे आदी उपस्थित होते.
हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या पुढाकारातून हिरवळ वनराई महिला सबलीकरण अभियानअंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुकास्तरीय पहिल्या महिला बचत गटाच्या वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
>सत्ता गाजविण्यापेक्षा वंचितांकडे लक्ष हवे
>सत्तेत विराजमान झाल्यावर लोकांवर सत्ता गाजवण्यापेक्षा वंचितांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापती अलका केकणे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असल्याचे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माणगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी संगितले.
माणगाव पंचायत समितीच्या २ कोटी ६७ लाख रु पये खर्च करून बांधलेल्या नवीन इमारतीचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्र माला वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार भरत गोगावले, अवधूत तटकरे, प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते.
भर उन्हाळ्यात कोकणात वाहणारी नदी पाहिल्याचे मुंडे यावेळी म्हणाल्या. रायगड जिल्ह्यातील जलयुक्तशिवार योजनेला ३१ कोटी रु पये दिले असून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. रोजगार हमीतून फळबागांचे काम घेता येईल पण रोजगार हमीच्या कामावर कोकणी माणूस जातो का हा संशोधनाचा विषय असल्याचेही त्यांनी संगितले. या वेळी त्यांनी बचत गट भवनाचा प्रश्न व पंचायत समितीसाठी लागणारे फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचा अर्थमंत्री म्हणून कोकणची जबाबदारी निश्चित पार पाडीन, ग्रामीण भागात पर्यटक जावा असा प्रयत्न केला जाईल, असे सांगून फळबाग विकसित करण्याचा सल्ला दिला.
>कोकणात पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न
कोकणात वसिष्ठी नदीतून वाहत जावून समुद्रास मिळणारे पाणी वाचवण्याच्या दृष्टीने कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन निश्चित योजना करण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोहयो आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या पार्श्वभूमीवर, कोयना धरणातून वीजनिर्मितीअंती वर्षाला ६७ टीएमसी पाणी वसिष्ठी नदीतून अरबी समुद्रात जावून मिळते या मुद्याकडे त्याचे लक्ष वेधले असता त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
मंत्रीपदी विराजमान झाल्यावर मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याचा दौरा केला. त्यातील अखेरचा जिल्हा रायगड होता. त्या रायगडच्या दौऱ्यावर त्या शुक्रवारी आल्या होत्या. दौऱ्याच्या अखेरीस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी मराठवाडा बालपणापासून पाहिला आहे. सातत्याने कोरड्या नद्याच पाहिल्या. मात्र गेटवे आॅफ इंडियाहून बोटीने मांडव्यास येवून पुढे महाडपर्यंत दौरा करुन मी येथे आले. या प्रवासात रायगड जिल्ह्यात वाहत्या नद्या पाहिल्या.
रायगडच्या दौऱ्याचा प्रारंभ शेतकरी कामगार पक्षाच्या स्वागताने होवून पुढे शिवसेना व राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेवून दौरा करुन, समारोप भाजपा आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Web Title: Take the ideal of Konkan in cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.