गृहखात्याची श्वेतपत्रिका काढा - विखे पाटील
By Admin | Updated: September 8, 2016 06:15 IST2016-09-08T06:15:43+5:302016-09-08T06:15:43+5:30
गृहविभागाला स्वतंत्र गृहमंत्री देण्याची मागणी करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गृहविभागाच्या कामगिरीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विधानसभेचे विरोधी

गृहखात्याची श्वेतपत्रिका काढा - विखे पाटील
मुंबई : गृहविभागाला स्वतंत्र गृहमंत्री देण्याची मागणी करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गृहविभागाच्या कामगिरीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.
पत्रपरिषदेत ते म्हणाले की, राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याची आकडेवारी एनसीआरबीच्या अहवालात नुकतीच देण्यात आली आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या मागे लागलेल्या सरकारमध्ये राज्याचे चित्र मात्र, ‘क्राइम इन महाराष्ट्र’ असे झाले आहे. भाजपाचे आमदार पोलिसांना मारहाण करीत निघाले आहेत. भंडाऱ्याचे भाजपाचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलिसांना मारहाण केली. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी धमक्या दिल्याने तेथील पोलीस निरीक्षकांनी आत्महत्येशिवाय आपल्याला पर्याय नसल्याची चिठ्ठी लिहून ठेवली, कल्याणमध्ये भाजपाच्या सहयोगी आमदाराने पोलीस अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली. आमदारच कायदा हातात घेत आहेत, असे विखे पाटील म्हणाले. शहीद पोलीस विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना हे सरकार कसले संरक्षण देणार, असा सवाल करून विखे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाची भूमिका नकारात्मक असल्याने पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत.