मराठी माणसाला हाकलण्याचा डाव
By Admin | Updated: March 10, 2015 04:26 IST2015-03-10T04:26:47+5:302015-03-10T04:26:47+5:30
बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी

मराठी माणसाला हाकलण्याचा डाव
मुंबई : बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी माणसांच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याने त्या प्रकल्पालाही त्यांनी विरोध केला. मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास आपण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मनसेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचा बारकाईने अभ्यास केला असता व तज्ज्ञांशी चर्चा केली असता हा आराखडा मराठी माणसाला मुंबईतून हाकलून लावण्याचा कट आहे. मुंबई अशी सरळ ताब्यात घेता येत नसेल तर टॉवरद्वारे ताब्यात घेण्याची योजना आहे. आराखड्यातील एफएसआय वाढीचा प्रस्ताव मराठी माणसाच्या हिताचा नाही. सध्या मुंबईत जे टॉवर उभे राहत आहेत त्यामध्ये मराठी माणसाला राहायला जागा नाही. त्याला तेथून हुसकावून लावले जाते. केवळ शाकाहारी लोकांना अनेक ठिकाणी घरे दिली जातात. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात गिरगावातील मराठी माणसांच्या घरावरच नांगर का फिरवला जाणार आहे, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मलबार हिलवरून मेट्रो रेल्वे का नेण्यात येणार नाही. गोराई येथील १५०० एकर जमीन ना विकास क्षेत्रातून बाहेर काढण्याचा निर्णय हा कुणाच्या फायद्याकरिता घेतला गेला आहे? या जमिनी अगोदरच उद्योगपतींनी विकत घेतल्या असून, त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले आहे. आरे कॉलनीमधील झाडांची कत्तलही काही विशिष्ट लोकांना तेथील जमीन हवी असल्याने केली जात आहे, असा आरोप
त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)