रत्नागिरी गॅस प्रकल्पावर जप्तीची कारवाई करणार
By Admin | Updated: March 24, 2015 00:11 IST2015-03-23T23:34:21+5:302015-03-24T00:11:49+5:30
अखेरची घरघर : सरपंचांनी केली पोलीस कुमकची मागणी

रत्नागिरी गॅस प्रकल्पावर जप्तीची कारवाई करणार
गुहागर : रत्नागिरी गॅस अॅण्ड विद्युत प्रकल्पाकडून अंजनवेल ग्रामपंचायतीचे करापोटी ६१ लाख १० हजार ९५९ रुपये थकीत राहिले आहेत. कंपनी प्रशासनाकडून थकीत कर भरला जात नसल्याने अंजनवेल ग्रामपंचायतीने प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक पोलीस संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे.
अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत यांनी याबाबत माहिती दिली. २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाकडून करापोटी १ कोटी १९ लाख ८२ हजार २७४ रुपयांचे बिल बजावण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत कर अदा न केल्याने मागणी हुकूम बजावल्यानंतर ५८ लाख ७१ हजार ३१५ रुपये कर कंपनी प्रशासनाकडून ग्रामपंचायतीत भरणा करण्यात आला. उर्वरित करासाठी ६ जानेवारी २०१५ला नोटीस देण्यात आली होती. कंपनी प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. २७ फेब्रुवारी २०१५ला ग्रामपंचायतीकडून जप्तीपूर्व अंतिम नोटीस देण्यात आली.
थकीत कराबरोबरच मागणी हुकूम शुल्क १ लाख १९ हजार ८२२ रुपये एवढी रक्कम येणे आहे. ही रक्कम कंपनी प्रशासनामार्फ त भरणा न केल्याने ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर विपरीत परिणाम झाला असल्याचा आरोप बाईत यांनी केला. थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायती कायदा १९५८ च्या कलम १२९ (८) अन्वये जप्ती प्रक्रियेचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यासाठी १०० पोलिसांची मागणी बाईत यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने आक्रमक पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीच्या थकीत करापोटी रत्नागिरी गॅसवर जप्तीची कारवाई होणार.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कुमक उपलब्ध करून देण्याची मागणी.
६१ लाखांपेक्षा अधिक कर.