विकास आराखडा तयार करणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: April 22, 2015 04:20 IST2015-04-22T04:20:08+5:302015-04-22T04:20:08+5:30
विकास आराखड्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे

विकास आराखडा तयार करणाऱ्यांवर कारवाई करा
मुंबई : विकास आराखड्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. प्रथम फ्रान्स, मग सिंगापूरच्या कंपन्या असा प्रवास करीत शेवटी आपल्याच अधिकाऱ्यांकडून आराखडा बनविण्यात आला. मात्र या निरर्थक आराखड्यासाठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांंवर कारवाई व्हायला हवी, असे राज यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. हा निरर्थक डीपी रद्द होण्यामागे श्रेय सजग मराठी माणसाचेच आहे, असेही त्यांनी या वेळेस स्पष्ट केले.
प्रस्तावित विकास आराखडा रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेनंतर राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, विकास आराखड्यातील गंभीर चुका पाहता याआधीच आराखड्याला केराची टोपली दाखवणे अपेक्षित होते. परंतु उशिरा का हाईना तो रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. मराठी माणसाच्या रेट्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे हा निरर्थक आराखडा हद्दपार करण्याचे श्रेय सजगतेने विरोध करणाऱ्या मराठी माणसाचे आहे.