कॅम्पा कोलावर आज कारवाई
By Admin | Updated: June 23, 2014 03:23 IST2014-06-23T03:23:16+5:302014-06-23T03:23:16+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाला प्रवेशद्वारावरच थोपवून ठेवणाऱ्या कॅम्पा कोलावासीयांनी रविवारी अखेर प्रशासनासमोर शरणागती पत्करली.

कॅम्पा कोलावर आज कारवाई
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाला प्रवेशद्वारावरच थोपवून ठेवणाऱ्या कॅम्पा कोलावासीयांनी रविवारी अखेर प्रशासनासमोर शरणागती पत्करली. कम्पाउंडमधील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी आणि गॅसजोडणी तोडण्यापासून सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांना अडवणार नसल्याचे रहिवाशांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतलेले रहिवासी आज मात्र थंडावलेले दिसले. प्रवेशद्वारासमोर जेमतेम १५ ते २० रहिवासी उभे होते. सकाळी आडेअकरा वाजता पालिका उपायुक्त आनंद वागराळकर पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांसोबत कम्पाउंडबाहेर दाखल झाले. १५ मिनिटे रहिवाशांसोबत चर्चा केली. त्यात वागराळकर यांनी रहिवाशांना विचार करण्यास शेवटची ३० मिनिटे दिली. त्यानंतरही पालिकेच्या कारवाईत आडकाठी केल्यास कोणत्याही क्षणी बळाचा वापर करण्याचा इशाराही दिला. दरम्यान, अर्ध्या तासाची मुदत देऊन १५ मिनिटे उलटली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते आणि आमदार बाळा नांदगावकर या ठिकाणी पोहोचले.
नांदगावकर यांनी पालिका अधिकारी - पोलिसांसोबत चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन येईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची विनंतीही केली. दुपारी ३ वाजता रहिवाशांच्या पाच प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यात रहिवाशांनी कारवाईत सहकार्य केल्यास नक्कीच काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे नांदगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)