पालकमंत्रीपदावरून रणकंदन

By Admin | Updated: December 29, 2014 00:00 IST2014-12-28T22:42:43+5:302014-12-29T00:00:54+5:30

राजकीय खळबळ : भाजपच्या वाट्याला यावेळीही वाटाणे

Tackle over Guardian Minister's post | पालकमंत्रीपदावरून रणकंदन

पालकमंत्रीपदावरून रणकंदन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रामदास कदम यांना मिळेल, या आशेवर असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या निराशेनंतर हे पद भाजपलाही मिळाले नसल्याने आता त्यांनीही या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत.
रत्नागिरीच्या वाट्याला युतीचे सरकार यापूर्वी एकदाच आले. त्या काळात रवींद्र माने, रामदास कदम हे दोघेही पालकमंत्री बनले. त्यानंतर प्रथमच राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगत असतानाच जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर यांची निवड झाली. या निवडीनंतर शिवसेना व भाजपचे पालकमंत्री न झाल्याबद्दल भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीची फैर प्रदेश पातळीपर्यंत पोहोचली असून, नजीकच्या काळात या निर्णयाचा फेरविचार झाल्यास पालकमंत्रीपद बदलले जाईल काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.
कोकणात यापूर्वी रत्नागिरीच्या वाट्याला परजिल्ह्यातील बहुतांश पालकमंत्री आले. हसन मुश्रीफ, दिग्विजय खानविलकर, अजित घोरपडे, बबनराव पाचपुते व सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली होती. त्यातल्या त्यात जुन्या काळात ल. रं. हातणकर यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. याआधीच्या आघाडी सरकारमध्ये भास्कर जाधव व उदय सामंत यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. कित्येक वर्षांनंतर राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम यांना हे पद मिळेल, असे वाटत असताना त्यांना जिल्ह्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या विनोद तावडेंकडे जिल्हा सोपविला जाईल, अशी अटकळ बांधली जात असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद शिवसेनेने आपल्याकडेच ठेवले.
रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यात भाजपला केवळ रायगडमध्ये यश मिळाले. जिल्ह्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गात शिवसेनेचेच अधिक आमदार आल्याने पालकमंत्री त्याच पक्षाचा होणार हे गृहीत असले तरी भाजपच्या कोकणातील वाढीसाठी रत्नागिरीकडे विनोद तावडे यांच्या रुपाने पालकमंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता असतानाच वायकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने पालकमंत्री पदाबाबत शिवसेना रामदास कदम यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने तर भाजप तावडे यांना हे पद न मिळाल्याने नाराज आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदानंतर उसळलेली ही नाराजी नजीकच्या काळात संपविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेकडून आमदार झालेल्या जिल्ह्यातील तीनही उमेदवारांना मंत्रीपदाची इच्छा होती. त्यामुळे जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेना-भाजप दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. (प्रतिनिधी)


भाजप अद्यापही आशावादी...
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आजपर्यंत भाजपची पाटी कोरीच राहिली आहे. राज्यात ज्या ज्यावेळी काँग्रेसविरोधी सरकार आले त्यावेळी जिल्ह्याबाहेरच्या व भाजपव्यतिरिक्त हे पद देण्यात आले. हीच परंपरा यावेळीही राखली गेली. आता ही पदे घोषित झाली असली तरी कालांतराने कोकणात मंत्रिमंडळ विस्तारात कदाचित भाजपला स्थान मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात जिल्ह्याला भाजपचा पालकमंत्री असण्याची आशा असल्याचे काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.


रत्नागिरीवर रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून यापूर्वी नेमण्यात आले. आता मुंबईतील व्यक्तीला हे पद देण्यात आले आहे. भाजप संघटना वाढीसाठी व शिवसेनाही आपल्या राजकीय विरोधकांना आव्हान देण्यासाठी आपापल्या नेत्याची वर्णी या पदासाठी लावण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, तो प्रयत्न आजच्या घडीला संपल्यात जमा आहे. परजिल्ह्यातील मंत्री असण्याची जिल्ह्यातील परंपरा सुरू असली तरी वायकर कोकणातील असल्याने त्यांना शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचे बोलले जाते.

Web Title: Tackle over Guardian Minister's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.