अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By Admin | Updated: March 17, 2017 16:11 IST2017-03-17T16:11:53+5:302017-03-17T16:11:53+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आंदोलन केलं.

A symbolic statue of Arundhati Bhattacharya was burnt | अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

 ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17 -  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी भट्टाचार्य यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीस विरोध दर्शवला होता. शेतक-यांचे कर्जमाफ करणे चुकीचे असल्याचे, त्यांनी म्हटले होते.  त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय छावा संघटनेने भट्टाचार्य यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 
 
यावेळी ५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  एका मुलाखतीत भट्टाचार्य यांनी सरकारकडून शेतक-यांना देण्यात येत असलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांना  यांनी विरोध करणारे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असे म्हटले होते की,  'कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या कजार्ची परतफेड करण्याच्या जबाबदारीवर विपरित परिणाम होतो. तसेच कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुका येण्याची वाट पाहतील आणि कजार्ची परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची प्रतीक्षा करतील'.
 
त्यांचे वक्तव्य हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख रणजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा संघटक प्रमोद देंडवे, आदी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
 
 
तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा आक्षेप विखे पाटील यांनी नोंदवला आहे. 
 
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे की, स्टेट बँकेच्या अध्यक्षांचे विधान कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा, या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आणि सभागृहाचा अवमान आहे. अरूंधती भट्टाचार्य या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. हा कायदेमंडळाचा अधिकार आहे. भट्टाचार्य यांनी केलेली विधाने घटनेच्या चौकटीबाहेरील व कायदेमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारी आहेत. यासंदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी,अशी मागणी आम्ही गुरुवारी केली होती. परंतु,अद्याप त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नसल्याने हक्कभंगाची सूचना दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.   
 

Web Title: A symbolic statue of Arundhati Bhattacharya was burnt