केडीएमटीच्या दुरवस्थेविरोधात मनसेने काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 13:17 IST2017-05-18T13:17:01+5:302017-05-18T13:17:01+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नवीन बसच्या दुरवस्थेविरोधात मनसेने गुरुवारी अभिनव आंदोलन केले.

केडीएमटीच्या दुरवस्थेविरोधात मनसेने काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 18 - कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नवीन बसच्या दुरवस्थेविरोधात मनसेने गुरुवारी अभिनव आंदोलन केले. केडीएमटीच्या बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती बस परिवहन अधिकाऱ्यांना भेट दिली.
कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरातील सुप्रसिद्ध मॉलशेजारी केडीएमटीची जागा असून त्याठिकाणी अनेक नव्या बस गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. जेएनएनयुआरएमअंतर्गत 60 नव्या कोऱ्या करकरीत बस 2 वर्षांपूर्वी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या.
कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठा गाजावाजा करुन या बसेस आल्याची दवंडी पेटवली होती. मात्र आल्यापासून या सर्व नवीन बस आहे तिथेच धूळ खात उभ्या आहेत. गेल्या 2 वर्षांत या बसेसपैकी अनेक बसचे टायर गायब आहेत, तर काही इंजिनचे पार्ट गायब आहेत. याहून धक्कादायक म्हणजे याठिकाणी असणाऱ्या काही बसेसचा वापर चक्क अंघोळ करण्यासाठी केला जातो. या बस वापरात काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज दिले, वारंवार विनंती केली. परंतु त्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याची माहिती मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.
दरम्यान या आंदोलनानंतरही महापालिकेने या बसेस वापरात काढल्या नाही तर महापालिका मुख्यालयात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी झालेल्या आंदोलनात माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज प्रकाश घरत, विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, सरोज भोईर, माजी नगरसेवक राजन मराठे, मनोज राजे, शहर सचिव प्रशांत पोमेंडकर, सागर जेधे, महिला सेनेच्या स्मिता भणगे, श्रद्धा किरवे, सुमेधा थत्ते, मनाली पेडणेकर, प्रतिभा पाटील, ममता आपटे, विभाग अध्यक्ष दीपक शिंदे, संजीव ताम्हाणे, सुभाष कदम, वेद पांडे, समीर पालांडे, निषाद पाटील, विजय शिंदे, शशिकांत कोकाटे यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.