टँकरमध्ये पाणी भरण्यावरुन सभापतीवर तलवारीने हल्ला
By Admin | Updated: May 4, 2016 17:33 IST2016-05-04T17:18:58+5:302016-05-04T17:33:51+5:30
शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़

टँकरमध्ये पाणी भरण्यावरुन सभापतीवर तलवारीने हल्ला
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ४ : शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ मिरी-तिसगाव पाणी पुरवठा योजनेचे पांढरीपुलाजवळ जलशुद्धीकरण केंद्र आहे़.
या जलशुद्धीकरण केंद्रावरुन खासगी टँकरद्वारे पाणी नेऊन विकण्याचा सपाटा काहींनी लावला होता़ मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास पाच टँकर घेऊन काही इसम या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी भरत होते़ याची माहिती मिळताच पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे हे तेथे गेले व खासगी टँकर भरण्यास त्यांनी विरोध केला़ याचा राग आल्याने पाच टँकरचालकांनी पालवे यांच्यावर तलवार व लाठीने हल्ला केला़ यात सभापती पालवे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे़