घुमानची रेल्वे फुल
By Admin | Updated: March 3, 2015 01:20 IST2015-03-03T01:20:46+5:302015-03-03T01:20:46+5:30
पंजाबातील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

घुमानची रेल्वे फुल
पुणे : पंजाबातील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून या संमेलनासाठी ५ ते ७ हजार रसिक येतील, असा विश्वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी सांगितले.
घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या नियोजनासंदर्भात देसडला आणि संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संमेलनासाठी एक रेल्वे नाशिक येथून, तर दुसरी रेल्वे मुंबईतून सोडण्यात येणार आहे. वसईतून रेल्वे सोडण्याचे निश्चित झाले होते; पण रसिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येऊन सोडण्यात येणार आहे. तर, दुसरी रेल्वे नाशिक येथून सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. घुमान येथील नागरिकांमध्ये संमेलनाविषयी उत्सुकता असल्याते ते म्हणाले.
रसिकांसाठी प्रश्नमंजूषा
४संयोजन समितीच्या वतीने प्रश्नमंजूषा घेण्यात येणार आहे. पहिले अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोठे व कोणत्या वर्षी झाले? पहिल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? ‘बालकवी’ नावाने कोणाला ओळखले जाते? ८८व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कोण आहेत? हे पाच प्रश्न आहेत. यातून विजेत्या २५ स्पर्धकांची निवड करून लकी ड्रॉद्वारे ५ जणांची निवड केली जाणार असून, त्यांना संयोजकांच्या वतीने घुमानला नेण्यात येईल, असे सुधीर शिंदे यांनी सांगितले.
प्रकाशकांबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्तात
घुमान येथे मराठी भाषक व्यक्ती नसल्याने पुस्तकविक्री होणार नाही, म्हणून प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसा ठराव प्रकाशकांच्या संघटनेने केला होता. त्यानंतर साहित्य महामंडळाने पुन्हा चर्चेसाठी हात पुढे करून हैदराबाद येथील महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. हैदराबाद येथे बैठक झाली; पण निर्णय अद्याप कळलेला नाही. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी १५ प्रकाशकांनी संमेलनासाठी नोंदणी केल्याचे सोमवारी सांगितले; पण नावे मात्र सांगितली नाही. महामंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला आहे, हे प्रकाशकांनाही अद्याप समजलेले नाही.
मराठी भाषक लोक नसल्याने घुमानला किती लोक येतील, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात येत होता. पण, लोकांचा प्रतिसाद बघता संमेलनास ६ ते ७ हजार लोक येतील, अशी खात्री वाटत आहे. पुणे आणि मुंबईतून खासगी बसनेही काही लोक येणार आहेत. नांदेडच्या नानक फाउंडेशनतर्फे १५० जणांचे पथक, तर इचलकरंजीतून २५० जण येणार आहेत.
- भारत देसडला, स्वागताध्यक्ष