स्वाइन वादळ!
By Admin | Updated: March 14, 2015 04:31 IST2015-03-14T04:31:19+5:302015-03-14T04:31:19+5:30
स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ

स्वाइन वादळ!
पुणे : स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी राज्यातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २६४ वर पोहोचली आहे. यावरून राज्यात स्वाइन फ्लू रोखण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे स्पष्ट होते.
गतवर्षी डिसेंबरमध्ये राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा फैलाव झाल्यानंतर लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणि बळींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यभरात सुमारे ११ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार संशयितांना आॅसेलटॅमीवीर औषधी देण्यात आली. १३१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले.
परिणामी लागण झालेल्यांची संख्या ३ हजार १३५ वर पोहोचली आहे. ४१० रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली़ पूर्णपणे बरे झालेल्या १३० जणांना शुक्रवारी रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)