सुनील जोशी प्रकरणी तलवारी म्यान
By Admin | Updated: November 7, 2014 05:01 IST2014-11-07T05:01:56+5:302014-11-07T05:01:56+5:30
लाचखोरीचा आरोप असलेले केडीएमसीतील अधिकारी सुनील जोशी यांच्या पालिका सेवेतील पुनरागमनामुळे आयुक्त रामनाथ सोनवणे
सुनील जोशी प्रकरणी तलवारी म्यान
कल्याण : लाचखोरीचा आरोप असलेले केडीएमसीतील अधिकारी सुनील जोशी यांच्या पालिका सेवेतील पुनरागमनामुळे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आणि पत्रकबाजी करणाऱ्यांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या आहेत. या प्रकरणी बराच गदारोळ झाल्यानंतरही जोशीने बिनदिक्कतपणे महापालिकेत ‘एण्ट्री’ केली. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या इशाऱ्यांचे काय झाले, असा सवाल करण्यात येत आहे.
दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा शासन निर्णय आहे. त्याआधारे जोशीला सेवेत घेण्याचा आयुक्तांचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. भ्रष्टाचाराला थारा नाही, अशी सदैव ग्वाही देणाऱ्या सोनवणे यांच्यावर वरिष्ठांच्या दबावामुळेच एका भ्रष्ट अधिकाऱ्याला थारा देण्याची नामुश्की ओढवल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. मात्र, कोणाचाही दबाव नाही. जोशीसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमानुसारच कामावर घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयात धाव घेऊन आयुक्तांना जाब विचारला होता. यानंतर, जाग आलेल्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपानेही पत्रकबाजी करून आयुक्तांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करावी लागली. भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना टार्गेट करताना भ्रष्टाचाराला साथ दिल्यास पालिकेतील युती तोडण्याची धमकी दिली होती. यावर युती तोडण्याची भाषा करणारे पवार कोण, असा सवाल करून कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी शिवसेनेने भ्रष्टाचाराला कधीच थारा दिला नाही. जोशीला आमचा विरोध कायम आहे, असा दावा केला होता़ वेळप्रसंगी आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला होता. या प्रकरणात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा विरोध असताना राष्ट्रवादीनेही पत्रकबाजी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सेवेत घेऊ नये, असा ठराव महासभेत झाला आहे. त्याचाही विसर नगरसेवकांना पडला आहे. (प्रतिनिधी)