स्वाईन फ्लूची टेस्ट मेडिकलमध्येच!
By Admin | Updated: February 8, 2015 01:16 IST2015-02-08T01:16:30+5:302015-02-08T01:16:30+5:30
उपराजधानी स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहे. याचा आढावा घेण्यासाठी नुकतेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी

स्वाईन फ्लूची टेस्ट मेडिकलमध्येच!
आरोग्य विभाग देणार पीसीआर यंत्र : सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची ग्वाही
नागपूर : उपराजधानी स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहे. याचा आढावा घेण्यासाठी नुकतेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयला स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्यासाठी असलेले पॉलिमर चेन रिअॅक्शन (पीसीआर) यंत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यामुळे आता मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या नमुन्यांची तपासणी होणार असून रुग्णाला तत्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे.
स्वाईन फ्लूचा आढावा घेण्यासाठी डॉ. सावंत बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी त्याच दिवशी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मेडिकलला भेट देऊन स्वाईन फ्लूची माहिती घेतली. फक्त मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार होत असल्याचे, पण स्वाईन फ्लूच्या नमुन्याची तपासणी मेयोत होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले. नमुने पाठविण्यात होत असलेला उशीर, अहवाल मिळणारा लागत असलेला वेळ लक्षात घेऊन त्यांनी आरोग्यविभागाच्यावतीने पीसीआर यंत्र देण्याची ग्वाही दिली. यामुळे सुमारे ४० लाखांचे हे यंत्र लवकरच मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात असणार आहे.
मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून संशयित रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे स्वत:ची इस्पितळे असताना स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती केला जात नाही. यामुळे मेडिकलमध्ये रुग्णांचा भार वाढत आहे. दुसरीकडे स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचे नमुने मेयोत पाठविण्यात येतात. परंतु त्याचा अहवाल मिळेपर्यंत बराच वेळ जात असल्याने रुग्णांच्या उपचाराशी दिशा ठरविण्यास वेळ जातो. या धर्तीवर हे यंत्र रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)