स्वाइन फ्लूचे आठवड्यात ३ बळी
By Admin | Updated: March 6, 2017 00:40 IST2017-03-06T00:40:24+5:302017-03-06T00:40:24+5:30
मोशी येथील रहिवासी महिलेचा भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.४) मृत्यू झाला.

स्वाइन फ्लूचे आठवड्यात ३ बळी
पिंपरी : मोशी येथील रहिवासी महिलेचा भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.४) मृत्यू
झाला. स्वाइन फ्लूमुळे आठ दिवसांत शहरात तिसरा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, एकाच आठवड्यात घडलेल्या तीन दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मोशी येथील ५४ वर्षीय महिलेवर भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी, १ मार्चला पिंपळे गुरव येथील ५० वर्षीय महिलेचा चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी २८ फेब्रुवारीला एका ५५ वर्षीय महिलेचा असाच स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. एका आठवड्यात एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे स्वाइन फ्लूबद्दलची भीती पुन्हा पसरू लागली आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेले रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टर आणि महापालिकेचा वैद्यकीय विभाग यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. तातडीच्या उपाययोजना करून साथीच्या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होते. परंतु समन्वयाचा अभाव असल्याने उपाययोजना वेळीच होत नाहीत.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांची याबाबत उदासीनता दिसून येते. स्वाइन फ्लूने एखादी व्यक्ती दगावल्यास तातडीची बैठक घेऊन खासगी डॉक्टरांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक असते. मात्र असे काही घडत नाही. खासगी डॉक्टरही महापालिकेच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेकडे यंत्रणा असूनही ती योग्य वेळी कामी येत नाही. (प्रतिनिधी)
>जनजागृती मोहीम सुरू
गेल्या काही दिवसांत शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी नुकतीच एक बैठक घेऊन खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्यांना सूचना दिल्या आहेत. गरोदर महिला, उच्च रक्तदाब अशा रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात टॅमी फ्लूू गोळ्या आणि स्वाइन फ्लूची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वैद्यकीय विभागाने जनजागृती मोहीमसुद्धा हाती घेतली आहे. एखाद्या संशयित रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागामार्फत तातडीने दखल घेतली जात आहे, असे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोखले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.