घुमान संमेलनाचा खर्च ५ कोटींवर!
By Admin | Updated: May 8, 2015 01:50 IST2015-05-08T01:50:26+5:302015-05-08T01:50:26+5:30
‘घुमान’चे संमेलन ताळेबंदच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने ऐतिहासिकच ठरले. आजवर दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंतच खर्चाची उड्डाणे घेणाऱ्या

घुमान संमेलनाचा खर्च ५ कोटींवर!
पुणे : ‘घुमान’चे संमेलन ताळेबंदच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने ऐतिहासिकच ठरले. आजवर दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंतच खर्चाची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनांच्या तुलनेत घुमानच्या संमेलनाने ५ कोटींपर्यंतची मजल मारली आहे. आयोजक संस्थांनी संमेलनाचा खर्च २ कोटी २९ लाख ४३ हजार ५०० रुपये सांगितला असला तरी यामध्ये पंजाब सरकारने केलेल्या खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही. या संमेलनासाठी पंजाब सरकारचा खर्च हा अडीच कोटी रुपयांच्या घरात होता.
साहित्य संमेलनाच्या हिशोबामध्ये पारदर्शकता राहावी या उद्देशाने स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी संमेलनाचा लेखापरिक्षणाचा सविस्तर वृत्तांत गुरुवारी पत्र परिषदेत मांडला. यामध्ये प्रतिनिंधींना अमृतसरला जाण्यासाठी ज्या दोन विशेष रेल्वेसेवा देण्यात आल्या त्याचा खर्च ७७ लाख ५३ हजार ४६ रुपये, प्रतिनिधी शुल्कातून जमा झालेली रक्कम ४९ लाख रुपये तसेच ग्रंथदिंडी, पुस्तके, निवास व्यवस्था, प्रिंटींग स्टेशनरी आदीसाठीचा खर्च २१ लाख ९३ हजार ५६ रुपये झाला असल्याचे सांगण्यात आले.
व्यासपीठाच्या सजावटीसाठी १३ लाख ४१ हजार ३२२ रुपये, मनोरंजनाकरिता ६ लाख २३ हजार रुपये तसेच ९ लाख १७ हजार ६५९ रुपये वाहतुकीसाठी खर्च झाला आहे. आयोजकांकडे जितकी रक्कम जमा झाली तितकाच खर्च झाल्याचे आवर्जून सांगण्यात आले. यामध्ये देसडला यांनी १ कोटी ३९ लाख ६६ हजार आणि संजय नहार यांनी संस्थेमधून १५ लाख २५ हजार रुपये इतकी पदरची रक्कम घातल्याचा स्पष्ट उल्लेखही यात करण्यात आला आहे.
तसेच घुमान संमेलनासाठी पंजाब सरकारकडून मोलाचे सहकार्य मिळाले पण ते आर्थिक स्वरूपात नाही. मराठी रसिकांची निवास व्यवस्था, मंडप उभारणी, भोजनव्यवस्था, वाहतूक, शौचायलाची व्यवस्था अशी धुरा पंजाब सरकारने सांभाळल्याचे देसडला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)