खासगी हेरांना सुगीचे दिवस

By Admin | Updated: October 7, 2014 05:53 IST2014-10-07T05:53:46+5:302014-10-07T05:53:46+5:30

राज्यातील निवडणुकांचा फड जसा रंगू लागला आहे तशी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून खासगी हेरांना (प्रायव्हेट डिटेक्टिव्ज) मागणी वाढू लागली आहे

Sweep Day for Private Spies | खासगी हेरांना सुगीचे दिवस

खासगी हेरांना सुगीचे दिवस

डिप्पी वांकाणी, मुंबई
राज्यातील निवडणुकांचा फड जसा रंगू लागला आहे तशी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून खासगी हेरांना (प्रायव्हेट डिटेक्टिव्ज) मागणी वाढू लागली आहे. प्रतिस्पर्धी पक्ष आणि उमेदवारांच्या हालचाली, रणनीती जाणून घेण्यासाठी आणि आपल्या गोटातील कोण व्यक्ती प्रतिस्पर्ध्याला फितूर आहे का, हे शोधण्यासाठी अधिकाधिक प्रमाणावर खासगी हेरांचा वापर केला जात आहे. हेरांची आणि ते पुरवणाऱ्या डिटेक्टिव्ह एजन्सीजना सुगीचे दिवस आले आहेत.
या क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील निवडणुकीत हेरांना आणि एजन्सीला उमेदवारांच्या मागे धावावे लागत होते, पण या वेळी परिस्थिती उलटी आहे. पक्ष आणि उमेदवार त्यांच्या मागे धावत आहेत आणि त्यामुळे त्यांनाही जिंकण्याची शक्यता असलेले उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.
लोटस डिटेक्टिव्ह एजन्सीचे उत्पल चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की यंदा खासगी हेरांना अधिक मागणी आहे. अधिकाधिक उमेदवारांना आमच्या सेवा हव्या आहेत. सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रत्येक मतदारसंघातून किमान पाच प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. मात्र राजकीय आणि निवडणूक या विषयांत तज्ज्ञ असलेल्या हेरांची कमतरता आहे. बहुतेक एजन्सी सध्या आपले ग्राहक निवडण्यात चोखंदळ बनल्या आहेत. त्यानुसार विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना या एजन्सीज प्राधान्याने आपल्या सेवा पुरवत आहेत. किंबहुना, याकडे भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून पाहण्याकडे या एजन्सीजचा कल आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
मागणीत वाढ झाली असली तरी एजन्सींनी त्यांच्या फीमध्ये वाढ केलेली नाही. आम्हाला अनेक उमेदवारांची कामे मिळाली आहेत. कित्येकांना आपल्या विरोधी उमेदवारांच्या वाईट किंवा नियमबाह्य कामांमध्ये रस आहे. विरोधी उमेदवार पैसे वाटताना किंवा दारू वाटताना छायाचित्रे मिळाल्यास त्यांना ती हवी आहेत, असे एका खासगी हेराने सांगितले.

Web Title: Sweep Day for Private Spies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.