किरण शिंदे
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांच्या अपहरणाच्या दाव्याने पुण्यात खळबळ उडाली होती. परंतू, हे अपहरण नाही तर दारु पिऊन झालेला अपघात होता हे स्पष्ट झाले आहे. दत्ता गाडेचे वकील वाजेद खान बिडकर यांनी अपहरणाचा दावा केला होता. तो खोटा ठरला आहे.
पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना 20 ते 22 लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर बातमी फिरत होती. प्रत्यक्षात वकील डोंगरे हे रात्री १० च्या सुमारास त्यांचा मित्र अनिकेत मस्के याच्यासोबत एका बारमधून बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. तसेच त्यांचे लोकेशन हे रात्री 11.30 वाजता व पहाटे 05 वाजता दिवे घाट येथे असल्याचे दिसत होते. त्यांच्या मोबाईलवरून 108/112 वर मदतीसाठी कॉल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक इसमाचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन प्राप्त झाला होता. सासवड पोस्ट येथील अंमलदार यांना कॉल झाला होता. स्वत: डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर फोन करून सांगितले होते. यानंतर ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल 108 ॲम्ब्युलन्स आली आणि त्यांना उपचारासाठी घेऊन गेली होती. सदर इसमाचे कोणत्याही प्रकारे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय दावा केला जात होता...
डोंगरे यांचे हडपसर येथून अपहरण करण्यात आले आणि त्यांना दिवे घाटावर नेण्यात आले. डोंगरे यांना घाटावर सोडण्यापूर्वी मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर, डोंगरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि वैद्यकीय मदत मागितली. डोंगरे सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.