राज्यात अवकाळी पाऊस कायम
By Admin | Updated: April 13, 2015 04:51 IST2015-04-13T04:51:11+5:302015-04-13T04:51:11+5:30
: अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडत असून,

राज्यात अवकाळी पाऊस कायम
मुंबई : अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडत असून, १६ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांना अवकाळी पावसासह गारांचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. १३, १४ व १५ एप्रिल रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर १६ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १३ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तर १४ एप्रिल रोजी विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. वातावरणीय बदलामुळे मागील दोन दिवसांपासून पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात वादळे तयार झाली आहे.
या प्रतिवादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारा पडत आहेत, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)