अॅण्टी करप्शनच्या कारवाईनंतर पोलीस कारवाईवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:28 IST2016-10-20T03:28:08+5:302016-10-20T03:28:08+5:30
विरार पोलीस ठाण्याअंतर्गत चांदीप पोलीस चौकीतील उपनिरीक्षकासह हवालदाराला रंगेहाथ अटक केल्यानंतर रेतीमाफियांविरोधात पोलिसांच्या कारवाईकडे संशयाने पाहिले

अॅण्टी करप्शनच्या कारवाईनंतर पोलीस कारवाईवर संशय
शशी करपे,
वसई- चोरटी वाहतूकप्रकरणी पकडण्यात आलेला ट्रक सोडवण्यासाठी तब्बल ६० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अॅण्टीकरप्शनने विरार पोलीस ठाण्याअंतर्गत चांदीप पोलीस चौकीतील उपनिरीक्षकासह हवालदाराला रंगेहाथ अटक केल्यानंतर रेतीमाफियांविरोधात पोलिसांच्या कारवाईकडे संशयाने पाहिले जात आहे. तर श्रमजीवी संघटनेने वसई ते मुंबईपर्यंत रेतीचा ट्रक पोचेपर्यंत किती हप्ता द्यावा लागतो, याचे रेटकार्डच जाहीर केल्याने पोलीस आणि महसूल खात्याच्या आशीर्वादाने वसईतून मुंबईकडे चोरटी रेतीची खुलेआम वाहतूक सुरु असल्याचे उजेडात आले आहे.
दहा दिवसांपूर्वी पालघर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी आपल्या पथकाच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद हाय वेवर धाड टाकून चोरट्या रेतीची वाहतूक करीत असलेल्या अकरा ट्रकवर कारवाई केली होती. विरार पोलिसांना अंधारात ठेवून ही कारवाई केली होती. तसेच पालघर गुन्हे शाखेने पहिल्यांदाच रेती वाहतुकीवर कारवाई केली होती. त्यामुळे पोलीस खात्यात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. गुन्हे शाखेचा थेट पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार होत असल्याने त्यांच्याच आदेशाने ही कारवाई केल्याचेही सांगितले जात होते. पोलीस अधीक्षक राऊत यांनी होनमाने यांच्या पथकाला कारवाई कराला लावून स्थानिक पोलिसांना झटका दिल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.
या कारवाईनंतर १३ आॅक्टोबरला विरार पोलिसांनी अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी धाडी मारून चोरट्या रेतीची वाहतूक करणाऱ्या २३ ट्रकवर कारवाई केली होती. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालक आणि मालक यांच्यावर कोणती कारवाई केली? याबाबत जाहिरपणे खुलासा केलेला नाही. त्यानंतर लगेचच ही सोमवारी चांदीप पोलीस चौकीतील पीएसआय तुषार शालीग्राम भदाणे आणि त्यांचे सहाय्यक हवालदार बाबासाहेब करण शेलार यांना ६० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी तडकाफडकी पालघर मुख्यालयात हजर करण्यात आले आहे. येत्या २३ आॅक्टोबरला पालघरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघत असून त्याच बंदोबस्तासाठी शेख यांनी बोलावण्यात आल्याचे वरवर सांगितले जात असले तरी चोरटी रेती वाहतूक प्रकरणातून त्यांना बाजूला करण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा सुुरु आहे.
या कारवाईनंतर पोलीस आणि रेती व्यावसायिक यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. काही व्यावसायिकांनी श्रमजीवी संघटनेची साथ घेत पोलीस आणि महसूल खात्याचा रेती चोरीत असलेला आर्थिक हितसंबंध चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे.
विरार पोलीस ठाण्याच हद्दीत महत्वाची रेती बंदरे आहेत. या बंदरातून रेती उत्खनन आणि वाहतुकीला मनाई आहे. असे असतानाही वैतरणा, खानिवडे यामोठ्या बंदरांसह विविध बंदरांमध्ये रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. मात्र, त्याकडे पोलीस आणि महसूल खात्याकडून कानाडोळा केला जात असल्याचे लपून राहिलेले नाही. वैतरणा रेल्वे पुलाला धोका पोचत असल्याने येथील रेती उत्खननाला पूर्णत: बंदी आहे. मात्र, आजही याठिकाणी खुलेआम रेती उत्खनन सुरु आहे. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी रेती उत्खनन आणि वाहतुकीला मनाई आहे. मात्र, विरार हायवेजवळ असलेल्या कणेर पोलीस चौकीचा परिसरात संध्याकाळी सहानंतर पहाटेर्पंत मुंबईतील रेतीमाफियांच्या गुंड टोळ्या आणि आलिशान गाड्यांनी फुललेला असतो. वैतरणा बंदरातून आलेले ट्रक सहीसलामत मुंबई आणि उपनगरात पोचवण्याची जबाबदारी या टोळ्ीकडे असते. ट्रक आल्यानंतर टोळीचे सदस्य मोटारसायकल आणि चारचाकी गाडीच्या संरक्षणात ट्रक सहीसलामत पोचवण्याचे काम करतात, हेही आता लपून राहिलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे कणेर पोलीस चौकीत असलेल्या पोलिसांच्या नजरेसमोरून दररोज बेकायदा रेती वाहतूक होत असताना कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न वसईकर विचारत आहेत. पोलीस आणि महसूल खात्याचा वरदहस्त असल्यानेच गेल्या कित्येक वर्षांपासून हा गोरख धंदा सुरु असल्याची चर्चा उघडपणे केली जात आहे.
>भूमिपुत्रांकडे रोजगार नाही
कुपोषणाच्या प्रश्नावर संघटनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी जव्हार-मोखाडा परिसरात व्यस्त आहेत. त्यामुळे बुधवारचा कबुली मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती विवेक पंडित यांनी दिली. सरकार कोणताच निणर्य घेत नसल्याने रेतीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
भूमिपुत्रांना सध्या रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे रेतीची चोरी सुरु झाली आहे. यात पोलीस आणि महसूल अधिकारी गुंतले आहेत. त्याचबरोबर रेती विकत घेणारे बिल्डरही दोषी आहेत. म्हणूनच एकट्या रेती व्यावसायिकाला दोषी न धरता बिल्डरांवरही कारवाई कराला हवी, असे पंडित यांनी सांगितले.