पुणे स्फोटात नक्षलींचा हात असल्याचा संशय
By Admin | Updated: September 11, 2014 03:20 IST2014-09-11T03:20:17+5:302014-09-11T03:20:17+5:30
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर १० जुलै रोजी झालेल्या बाँबस्फोटात नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता

पुणे स्फोटात नक्षलींचा हात असल्याचा संशय
डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर १० जुलै रोजी झालेल्या बाँबस्फोटात नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की ज्याप्रकारे हा स्फोट घडवण्यात आला त्यावरून संशयाची सुई नक्षलवाद्यांकडेही वळते. ज्यांनी स्फोट घडवला त्यांना जर मोठ्या प्रमाणात घातपात घडवायचा असता आणि सामान्य नागरिकांचा जीव घ्यायचा असता तर त्यांनी एखाद्या मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बाँब पेरला असता. मात्र नक्षलवाद्यांनी आजवर सामान्य नागरिकांना सहसा लक्ष्य बनवलेले नाही. ते शक्यतो सुरक्षा दलांतील कर्मचाऱ्यांना आपले लक्ष्य बनवतात. पोलीस ठाण्याच्या बाहेर, पोलिसांसाठी राखीव पार्किंगमध्ये बाँब बसवलेली दुचाकी लावणे हे पोलिसांना लक्ष्य बनवण्याच्या नक्षलवाद्यांच्या मानसिकतेचे द्योतक आहे. स्फोटात वापरलेली दुचाकी सातारा न्यायालयाच्या आवारातून चोरली होती आणि तिची नंबरप्लेटही बदललेली नव्हती. बाँब बनवण्यासाठी पोटॅशियम आणि अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकांचा वापर करण्याची पद्धतही नक्षलवाद्यांच्या कृत्यांशी सुसंगत आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक नक्षल कार्यकर्त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना संशय आहे, की त्याचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवला गेला असावा.