तहसीलदारांचे निलंबन टळले
By Admin | Updated: April 1, 2015 02:05 IST2015-04-01T02:05:04+5:302015-04-01T02:05:04+5:30
निवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या

तहसीलदारांचे निलंबन टळले
गजानन मोहोड, अमरावती
निवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या डोक्यावरची संभाव्य निलंबनाची टांगती तलवार दूर झाली. तर दुसरीकडे राज्यातील २ हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठरल्या कार्यक्रमानुसार पार पडण्याचा मार्गही मोकळा झाला.
सोमवारी अधिसूचना न काढणाऱ्या तहसीलदारांना निलंबित करून गटविकास अधिकाऱ्यांकडून निवडणुकांचे काम करून घेण्याचा बडगा निवडणूक आयोगाने उगारला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी निवडणूक आयोग आणि ग्रामविकास मंत्रालयाशी चर्चा केली. सर्व तालुक्यांना देय असलेली निवडणुकीची थकबाकी ३० एप्रिलपर्यंत वितरित केली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयातून त्यांना देण्यात आले. त्यामुळे तिढा सुटून दोन हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना रात्री १२ पूर्वीच आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी काढली.