वह्या खरेदीला स्थगिती
By Admin | Updated: July 21, 2015 01:26 IST2015-07-21T01:26:03+5:302015-07-21T01:26:03+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वही खरेदी प्रक्रिया स्थगित करण्यात आली

वह्या खरेदीला स्थगिती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वही खरेदी प्रक्रिया स्थगित करण्यात आली. खरेदी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सदर निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप वह्या पुरविता आल्या नसल्याची स्पष्ट कबुली आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी आदिवासी शाळांतील मुलींना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील शाळा सुरू होऊन महिना उलटून गेला; तरी आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप सोयी-सुविधा व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलध झाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री सवरा म्हणाले की, राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकूण ४९० वसतिगृहे आहेत. यातील ३३४ वसतिगृहे ही शासकीय इमारतींत तर १५६ वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. यातील २०७ वसतिगृहे ही आदिवासी मुलींसाठी असून, येथे आदिवासी विकास विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यात येतात.
मात्र, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश देण्यात आले नसून एका महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील, असे आश्वासन सवरा यांनी दिले.
मंत्र्यांच्या उत्तरानंतर, वह्या-पुस्तकासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाला स्थगिती का दिली, यात कोणता गैरव्यवहार झाला, याची उच्चस्तरीय चौकशी करणार का, अशा प्रश्नांची सरबत्तीच विरोधी सदस्यांनी केली. मात्र, खरेदीच झालेली नसल्याने गैरव्यवहार झाल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा आदिवासी विकास मंत्र्यांनी
केला.
गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मंत्री सवरा यांना कोंडीत पकडल्याने सभापती निंबाळकर यांनी याविषयी आमदारांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले.