सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती
By Admin | Updated: May 9, 2015 02:32 IST2015-05-09T02:32:10+5:302015-05-09T02:32:10+5:30
‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान सलीम खानला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली

सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती
मुंबई : ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान सलीम खानला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. सलमानला ३० हजारांचा जामीनही न्यायालयाने मंजूर केला. या वृत्ताने सलमानच्या चाहत्यांनी न्यायालयाबाहेर एकच जल्लोष केला. उच्च न्यायालयाची प्रत हाती आल्यानंतर सलमान सायंकाळी सत्र न्यायालयात हजर झाला व त्याने जामिनाची प्रक्रियादेखील पूर्ण केली.
वांद्रे येथे २८ सप्टेंबर २००२ रोजी भरधाव गाडी चालवत पाच जणांना चिरडले. यात एकाचा बळी गेला होेता. या प्रकरणी बुधवारी सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच दिवशी उच्च न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सलमानने या शिक्षेविरोधात अपील याचिकाही न्यायालयात दाखल केली.
शुक्रवारी न्या. अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. त्यात सलमानचा जामीन पुढेही कायम राहणार की त्याला तुरुंगात जावे लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण न्यायालयाने जामीन रद्द केला असता, तर सलमानला कारागृहात जावे लागले असते.
मात्र न्या. ठिपसे यांनी न्यायालयातील तरतुदींचा आधार घेत सलमानची अपील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत त्याला जामीन मंजूर केला. अॅड. अमित देसाई यांनी सलमानला परदेशी जाण्यास अर्ज करायलाही परवानगी द्यावी, अशी विनंती केली. अर्ज करण्याचा अधिकार सलमानकडून कोणी हिरावून घेतलेला नाही. त्याने यासाठी रीतसर अर्ज करावा व त्यावर न्यायालय सुनावणी घेऊन निर्णय देईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
शिक्षेला स्थगिती का?
तसेच सर्वसामान्यपणे एखाद्या आरोपीने सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्याची शिक्षा रद्द केली जाते. मात्र या प्रकरणात सरकारी पक्षाने शिक्षा रद्द करण्याला विरोध केला आहे. पण कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेला स्थगिती देण्यात काही गैर नाही. त्यामुळे सलमानची शिक्षा स्थगित केली जात आहे, असे न्या. ठिपसे यांनी स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी आता १५ जूनला होणार आहे.