प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या लाभांना स्थगिती
By Admin | Updated: April 1, 2015 02:06 IST2015-04-01T02:06:39+5:302015-04-01T02:06:39+5:30
राज्यातील नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरावी तसेच त्यांना सेवा ज्येष्ठतेचे लाभ देण्यात यावेत,

प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या लाभांना स्थगिती
पुणे : राज्यातील नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरावी तसेच त्यांना सेवा ज्येष्ठतेचे लाभ देण्यात यावेत, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
नेट- सेटमधून सूट मिळण्याच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे एकत्रित करावीत तसेच त्यासाठी एक स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून त्यावर निकाल द्यावा,असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नेट सेट परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या राज्यातील प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरून त्याचे
लाभ मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात काहींनी धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला होता.
संबंधित प्राध्यापकांची सेवा त्यांच्या नियुक्तीपासून गृहित धरून त्यांना दरवर्षी सहा टक्के प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, असा निर्णय दिला होता. परंतु,उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २५ मार्च रोजी अंतिम निकाल दिला तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्र खंडपीठासमोर या सर्व प्रकरणांची सुनावणी करावी, असे स्पष्ट केले.
या सर्व प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून दिला जावा. त्यात या प्रकरणासंदर्भात कोणताही निर्णय दिलेल्या खंडपीठातील न्यायाधिशांचा समावेश करू नये. नेट सेट बाबतच्या अद्याप प्रकाशात न आलेल्या विविध बाजू समजावून घ्याव्यात. तसेच राज्य शासनाने या प्रकरणाची सुनावणी नव्याने होणार असल्याचे सूचित करावे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)