आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
By Admin | Updated: June 8, 2016 02:11 IST2016-06-08T02:11:07+5:302016-06-08T02:11:07+5:30
बार चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी नवी मुंबई परिमंडळ २ मधील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
पनवेल : पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावी केल्याप्रकरणी व बार चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी नवी मुंबई परिमंडळ २ मधील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून प्रकाश घुले असे त्यांचे नाव आहे.
गेल्या महिन्यात खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसूडगाव येथे इंटरनेट बारमध्ये खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत काकडे, कामोठे पोलीस ठाण्याचे महेंद्र बोंदाडे, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे प्रकाश घुले व पायधुनी मुंबई पोलीस ठाण्याचे प्रफुल्ल पालवे मद्यपान करण्यासाठी गेले असताना त्यांनी बारमधील वेटरला व खांदेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरु वात केली. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत काकडे, कामोठे पोलीस ठाण्याचे महेंद्र बोंदाडे यांना निलंबित केले होते. दरम्यान, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांनी कोपरखैरणे येथील पोलीस हवालदार प्रकाश घुले याला देखील निलंबित केले आहे.