दोन पोलिसांना केले निलंबित

By Admin | Updated: August 22, 2015 00:58 IST2015-08-22T00:58:39+5:302015-08-22T00:58:39+5:30

छेडछाड करणाऱ्या तरुणाला पाठिशी घालत पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याने तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शहरात संतप्त प्रतिक्रिया

Suspended the two policemen | दोन पोलिसांना केले निलंबित

दोन पोलिसांना केले निलंबित

औरंगाबाद : छेडछाड करणाऱ्या तरुणाला पाठिशी घालत पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याने तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी दोन पोलिसांनी तडकाफडकी निलंबित केले. तर सहायक फौजदाराची उचलबांगडी केली.
श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणामुळे शहरात पोलिसांविरुद्धच जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सिडको ठाण्यातील सहायक फौजदार राजू वैष्णव व जमादार एन.डी. हिवाळे यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले. तर सहायक फौजदार हरीष खटावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.
आरोपी स्वप्नील मिणियार (२४, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) याच्याकडून सतत येणाऱ्या अश्लील एसएमएस, फोन आणि धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या श्रुतीने १७ आॅगस्टला विषारी गोळ्या सेवन केल्या होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० आॅगस्टला तिचे निधन झाले. विशेष म्हणजे याप्रकरणी केवळ विनयभंगासारखा किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करून सिडको पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले होते. एवढेच नव्हे तर २४ जुलैला त्याच्याविरोधात छेडछाड आणि अश्लील एसएमएस पाठविणे आणि धमकावण्याची तक्रार श्रुतीने पोलिसांकडे नोंदविली. मात्र तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्याच वेळी आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर पहिल्या तक्रारीनंतर तिला धमकावण्याची आरोपीची हिंमत झाली नसती आणि ती आज जिवंत असती, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. श्रुतीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी स्वप्नीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लावले आहे. अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाही. शुक्रवारी श्रुतीची बहीण श्रद्धा अमितेश कुमार यांना भेटली. सिडको पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा तिने पाढाच वाचला. श्रुतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ वाजेपर्यंत पोलीस तिचा जबाब नोंदविण्यासाठी आले नव्हते. धावाधाव केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस रुग्णालयात आले, असे तिने सांगितले.
सहायक फौजदार हरीश खटावकर यांनी माझ्याशी अश्लील शब्द वापरले, त्यांनी आपल्याला उद्धट वागणूक दिली, अशा आशयाची तक्रार श्रद्धाने अमितेशकुमार यांच्याकडे केली.
आरोपी मिणियारच्या वकिलाने त्याच्या सांगण्यावरून आणि पोलिसांच्या सहकार्याने रुग्णालयात जाऊन श्रुतीची भेट घेतली होती. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी हिवाळे हे त्यास घेऊन रुग्णालयातील आयसीयूमध्ये आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended the two policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.