तीन कार्यकारी अभियंते निलंबित
By Admin | Updated: May 9, 2015 01:38 IST2015-05-09T01:38:19+5:302015-05-09T01:38:19+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी दोघे गैरव्यवहारात अडकलेले असून, एक

तीन कार्यकारी अभियंते निलंबित
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी दोघे गैरव्यवहारात अडकलेले असून, एक जण बदलीच्या जागी रुजू झाले नाहीत म्हणून निलंबित झाले.
आनंद कुलकर्णी यांनी बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासूनचे हे पंचविसावे निलंबन आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्यांमध्ये बीड येथील व्ही.के. बाविस्कर, औरंगाबादच्या दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे गिरीश जोशी आणि नाशिकच्या ओल्या पार्टीप्रकरणी गाजलेले आर.टी. पाटील यांचा समावेश आहे.
गिरीश जोशी हे नांदेड जिल्ह्यात कार्यकारी अभियंता असताना रस्त्यांच्या कामात लाखोंचे गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, या प्रकरणी त्यांची चौकशीही सुरू आहे. त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यांची कामे तुकडे न करताच करावीत असा नियम असताना व्ही.के. बाविस्कर यांनी ती तुकड्यांमध्ये केली. हॉटमिक्सची कामे मजूर सहकारी संस्थांना देऊ नयेत, असा नियम असतानाही ती त्यांच्या कार्यकाळात दिली गेली.
शिवाय, कंत्राटदारांनी कामे अपूर्णावस्थेत सोडून दिल्याने ती बांधकाम विभागाला आपल्या खर्चाने पूर्ण करावी लागली. त्यामुळे विभागाला आर्थिक फटका सहन करावा लागला, असाही आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी होत्या. (विशेष प्रतिनिधी)