स्टेट बँक दरोड्याचा सूत्रधार निलंबित पोलीस!
By Admin | Updated: December 28, 2014 23:47 IST2014-12-28T23:47:36+5:302014-12-28T23:47:36+5:30
जालना येथे चित्रपटगृहात बसून शिजला कट
_ns.jpg)
स्टेट बँक दरोड्याचा सूत्रधार निलंबित पोलीस!
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : स्टेट बँकेच्या साखरखेर्डा येथील शाखेची ३0 लाखांची रोकड लुटण्याच्या घटनेमागे एक निलंबित पोलीस शिपाई असल्याचे उघड झाले आहे. हा दरोड्याचा कट जालना येथील एका चित्रपटगृहात बसून रचल्याची माहिती या प्रकरणी अटक केलेल्यांनी पोलिसांना दिली.
साखरखेर्डा स्टेट बँकेची कॅश व्हॅन (स्वीफ्ट गाडी) चिखली येथून साखरखेर्डा, देऊळगाव मही, अमडापूर या पाच शाखांमध्ये पैसे ने-आण करण्याचे काम करीत होती. जालना जिल्ह्यातील डुकरे पिंपरी येथील आकाश पांडूरंग थेटे याने त्याचा चुलतभाऊ सुदर्शन हरिभाऊ थेटे याला चिखली ते साखरखचेर्डा मार्गावर धावणार्या बँकेच्या या गाडीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
२६ डिसेंबरला शाखेचे कॅशियर विजयसिंह शिखरवार आणि शिपाई नंदू जाधव ३0 लाख रुपयांची रोकड घेऊन सुरक्षारक्षक प्रल्हाद शिंदे आणि वाहनचालक मधुकर लोखंडे यांच्यासह दुपारी २ वाजता बँकेतून निघाले. त्यानुसार याची संपूर्ण माहिती सुदर्शनने मोबाईलवरुन या दरोड्याचा मुख्य सूत्रधार निलंबित पोलीस शिपाई शिवाजी भागडे याला दिली. या कटातील इतर दरोडेखोर त्याला ह्यसरह्ण म्हणून संबोधीत होते.
त्याचे इतर पाच साथीदार मेहकर फाट्यावर उभे होते. सुदर्शनचा संदेश मिळाल्यानंतर शिवाजीने बँकेच्या गाडीचा महिंद्रा पिकअपने पाठलाग केला. नंतर गाडीला ओव्हरटेक करीत एका शेताजवळ महिंद्रा पीकअप आडवी लावून बँकेची गाडी अडविली. पाच दरोडेखोरांनी क्षणात कॅशव्हॅनवर हल्ला चढविला. आणि गाडीतील ३0 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
यातील लहू जाधव या दरोडेखोरास परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी पकडले. एक दरोडेखोर हाती लागल्याने पोलिसांना नंतर एका-एका साथीदारास पकडण्यात यश आले.