चोरटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या १९ बसेस निलंबित
By Admin | Updated: May 4, 2015 01:44 IST2015-05-04T01:44:25+5:302015-05-04T01:44:25+5:30
शहरात थांब्यांवरून प्रवाशांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १९ खाजगी बसेसवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून त्या निलंबित केल्या आहेत.

चोरटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या १९ बसेस निलंबित
ठाणे : शहरात थांब्यांवरून प्रवाशांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १९ खाजगी बसेसवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून त्या निलंबित केल्या आहेत. या कारवाईचा त्रास सोसायटीवाल्यांना होऊ नये म्हणून त्यांना ओळखपत्र द्यावे, असे आवाहन आरटीओ विभागाने सोसायट्यांना केले आहे.
स्थानिक परिवहन बससेवेच्या थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी ठाणे आरटीओकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन आरटीओच्या भरारी पथकाने नितीन कंपनी, कॅडबरी नाका, माजिवडा आदी ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार, १९ खाजगी बसचालक अशा प्रकारे चोरटी प्रवासी वाहतूक करताना सापडले. या सर्व बसेस निलंबित केल्या आहेत. यात मीरा-भार्इंदरमधीलही काही बसेस असल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली.
‘‘खाजगी बसेसमधून होणाऱ्या चोरट्या प्रवासी वाहतुकीला आळा बसावण्यासाठी सोसायटीधारकांना ओळखपत्र द्यावे. त्यामुळे प्रवासी हे त्याच सोसायटीच्या बसमधील आहेत, हे स्पष्ट होईल, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले