Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. संपूर्ण राज्यातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसत नाही. तर आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातील अनेक जण शिंदे गटात येणार असल्याचे दावे केले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
३० वर्ष नीलम गोऱ्हे पक्षात होत्या, त्यांनी किती कमावले
यावरून आता ठाकरे गटाने पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दोन मर्सिडीज? नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. जवळपास ३० वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढली आहेत. त्या जे काही म्हणत आहेत, त्यात तथ्य असेल तर प्रश्न पडला आहे की, मग नीलम गोऱ्हे यांनी किती कमावले असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकू द्यायच्या नाहीत. ३० वर्ष त्याच मातोश्रीवर असल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सर्व नेमणुकांचे अधिकार हे जवळपास नीलम गोऱ्हे यांच्याकडे होते. त्यांच्याच सहीने गोष्टी पुढे सरकायच्या. निश्चितपणे ही सगळी कामाई नीलम गोऱ्हे यांच्याकडे जात असेल त्यांना याबाबत विचारले पाहिजे, फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत. मातोश्रीवर कधी कोणी जावे, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचे, कोणाला पद द्यायचे नाही, प्रवेश सगळे त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. त्यांचा वार्षिक कमाईचा एव्हरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होते, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी पलटवार केला.
दरम्यान, नीलम गोऱ्हेंनी एवढा पैसा ठेवलाच कुठे? हा खरा माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. इतक्या सगळ्या पैशांचे तुम्ही काय केले. दुसरा कोणताही माणूस मातोश्रीवर वावरत नव्हता. पक्ष फुटीनंतर, त्या सगळ्या काळात फक्त आणि फक्त पक्षात नीलम गोऱ्हेच होत्या. नीलम गोऱ्हे यांनी त्या पैशाचे काय केले आणि त्या पैशांचं स्त्रोत काय होता, त्याची विल्हेवाट कशी लावली. त्यांनी परदेशात किती पैसे गुंतवले. कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली. नेमके काय-काय केले, हे सगळे नीलम गोऱ्हे यांना विचारले पाहिजे. चापलूसी करून किंवा बदमाशी करून मर्जी मिळवून पद मिळवणारी लोक असतील, तर अशा लोकांवर अजिबात आपण वेळ वाया घालवायचा नाही. आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे ४ वेळा आमदार असल्या काय आणि नीलम गोरे विधानसभेवर असल्या काय आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे एक क्रमांकाच्या चापलूस, बदमाश आणि गद्दार आहेत, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली.