लालबागमधील पेरू चाळीतले रहिवासी त्रस्त

By Admin | Updated: August 3, 2016 02:14 IST2016-08-03T02:14:31+5:302016-08-03T02:14:31+5:30

महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराच्या ‘युती’मुळे मुंबईतील रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याची चौकशी सुरू आहे.

Surrounded by the Peruvian chawl residents of Lalbagh | लालबागमधील पेरू चाळीतले रहिवासी त्रस्त

लालबागमधील पेरू चाळीतले रहिवासी त्रस्त


मुंबई : महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराच्या ‘युती’मुळे मुंबईतील रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे लालबागमधील पेरुचाळीच्या इमारत दुरुस्ती कामामध्येही कंत्राटदाराने घोळ केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळवून या कंत्राटदाराकडून ५० टेनामेंट या इमारतीचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम करण्यात येत आहे. त्यामुळे या दुरुस्तीनंतर इमारतीचे आयुष्यमान वाढण्याऐवजी उलट कमीच होत आहे.
लालबाग- परळ भागात पूर्वी मुंबई महापालिकेने पुनर्विकसित केलेल्या काही इमारती आहेत. त्याच्या देखभालीचा खर्च पालिकेकडूनच करण्यात येतो. अशाच प्रकारच्या ‘५० टेनामेंट’ या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पालिकेने १ कोटी ७२ लाख ५३ हजार रुपयांचे कंत्राट प्राइम डेव्हलपर्स या कंत्राटदाराला दिले. आॅक्टोबरपासून त्याने दुरुस्ती कामाला सुरुवातही केली. परंतु, पावसाचे दोन महिने उलटले, तरीही अद्याप बरेच काम शिल्लक आहे. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कंत्राटदाराकडून करण्यात आलेले कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे आत्तापर्यंत होत नसलेल्या ठिकाणीही गळती सुरू झाली आहे. गच्चीवरील पाण्याची टाकी दुरुस्ती काम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गळायला लागली, वॉटरप्रुफिंगसाठी टाकण्यात आलेल्या चकत्याही उचकटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे दुरुस्ती काम करताना कंत्राटदाराने अनेक ठिकाणी स्टक्चरल आॅडिटमध्ये करण्यात आलेल्या सुचनाही धाब्यावर बसविल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी पालिकेच्या वॉर्डातील अधिकारी आणि इमारत दुरुस्ती विभागाकडे अनेकदा दाद मागूनही कामात सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता काही रहिवाशांनी कंत्राटदाराचे कामच नको, त्यापेक्षा स्वखर्चाने काम करू, असा पवित्रा घेतला आहे. स्थानिक नगरसेवक नाना आंबोले यांनीही पालिकेकडे तक्रारी करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही उपयोग झाला नसल्याने रहिवाशांनी आता थेट पालिका आयुक्त अजय मेहता यांचे दरवाजे ठोठावले आहेत. परंतु, अजुनही कंत्राटदाराच्या अभियंत्यांना साधा मेमो बजावण्याचीही तत्परता पालिकेकडून दाखविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
>राहणे बनू लागलेय अवघड
या दुरुस्ती कामांमुळे इमारतीचे आयुष्य वाढण्याऐवजी घटत आहे. ही कामे अशीच सुरू राहिली, तर उद्या पालिका इमारत धोकादायक ठरवून आम्हाला घराबाहेर काढेल, याचीच भीती वाटते. वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेकडून कोणतीही पावले उचण्यात येत नाहीत, त्यामुळे आमचे इथे राहाणे अवघड झाले आहे.
- मिलिंद खोत, सेक्रेटरी-रहिवासी
रहिवाशांचा आडमुठेपणा
आम्ही कामामध्ये काहीच त्रुटी ठेवलेली नाही. रहिवाशांच्या आडमुठेपणामुळेच इमारतीचे काम थांबले आहे. पावसात होणारी गळती थांबविण्यासाठी पूर्वीचे आरसीसीचे काम तोडणे गरजेचे आहे. मात्र रहिवासी ते काम पूर्ण करू देत नाहीत. त्यांनी सुमारे एक -दीड महिना हे काम रोखून धरले होते. तसेच पाण्याच्या टाकीची दुरुस्ती केल्यानंतर ७२ तास पाणी सोडू नये, असे सांगितल्यानंतरही रहिवाशांनी त्यात पाणी सोडले. त्यामुळे टाकीतून पाणी गळत आहे. तरीही आम्ही पुन्हा दुरुस्ती करून देण्यास तयार आहोत.
- जितू सिंग, अधिकारी, प्राइम डेव्हलपर्स

Web Title: Surrounded by the Peruvian chawl residents of Lalbagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.