आश्चर्य ! गुराख्यावरील अस्वलाचा हल्ला बैलाने परतवला
By Admin | Updated: August 27, 2016 21:24 IST2016-08-27T21:22:19+5:302016-08-27T21:24:55+5:30
आपल्या मालकावर अस्वलाने केलेला हल्ला चक्क बैलाने परतून लावला. बैलाने आपल्या मालकाचा अस्वलापासून वाचवलेला जीव गावात चर्चेचा विषय झाला आहे

आश्चर्य ! गुराख्यावरील अस्वलाचा हल्ला बैलाने परतवला
>- ऑनलाइन लोकमत
चिखलदरा, दि. 27 - आपल्या मालकावर अस्वलाने केलेला हल्ला चक्क बैलाने परतून लावला. बैलाने आपल्या मालकाचा अस्वलापासून वाचवलेला जीव गावात चर्चेचा विषय झाला आहे. अस्वलाच्या या हल्ल्यात बाबू बालाजी जामुनकर (५५, रा.कनेरी) जखमी झाले आहेत.
तालुक्यातील बामादेही व कनेरी परिसरात काही दिवसांपासून अस्वलाने धुमाकूळ घातल्याने आदिवासी दहशतीखाली वावरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी अस्वलाने बाबू बालाजी जामुनकर या गुराख्यावर हल्ला करून जखमी केले. खंडू नदीजवळील त्यांच्या शेतात गुरे चारायला गेला असता बैल झुडुपात शिरताच अस्वलाने बाहेर येऊन हल्ला केला. दोघांमध्ये जवळपास १० मिनिटे लोम्बाझोंबी झाली. यात बाबूच्या हाताला अस्वलाने चावा घेतल्याने तो जखमी झाला .
बाबू आणि अस्वलामध्ये संघर्ष सुरु असताना बैलाने मागून येऊन अस्वलावर शिंगाने वार करायला सुरुवात केली. परिणामी घाबरून अस्वलाने जंगलात पळ काढला. गुराख्यासाठी बैलाने आपला जीव पणाला लावून मालकाला वाचविले, हा परिसरात चर्चेचा विषय ठरला. गत आठवड्यात बामादेही येथील राजेराम रामाजी धिकार (५४) यांनासुद्धा अस्वलाने जखमी केले होते. त्यामुळे परिसरात अस्वलाचा धुमाकूळ व दहशत वाढली आहे. अस्वलाला पकडून वनविभागाने पिंजरे लावून दुसऱ्या जंगलात सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जखमी आदिवासींना मोबदला देऊन परिसर दहशतमुक्त करण्याचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे यांनी संबंधितांना पाठविले आहे.