तीन लिंग असलेल्या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया
By Admin | Updated: August 22, 2015 01:12 IST2015-08-22T01:12:58+5:302015-08-22T01:12:58+5:30
दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या बाळाला तीन लिंग आणि गुद्द्वाराची जागा बंद होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत
तीन लिंग असलेल्या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया
मुंबई : दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या बाळाला तीन लिंग आणि गुद्द्वाराची जागा बंद होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्याला उपचारांसाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी या चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पुढच्या काही दिवसांतच हा चिमुरडा घरी परत जाणार आहे.
या बाळाला जन्मल्यापासून पोटाला नळी लावून नैसर्गिक विधी केले जात होते. डॉ. कोठारी यांनी पुढे सांगितले, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाला रुग्णालयात तपासणीसाठी आणले. या वेळी उजवीकडच्या लिंगातून लघवी जात होती. पण, डावीकडच्या लिंगातून लघवी जात नव्हती; आणि खाली एक लिंग होते त्याची वाढ पूर्ण झालेली नव्हती. यानंतर गुद्द्वाराची जागा तपासल्यावर ती बंद असल्याचे अचूक निदान
झाले. तिथे एक मांस, हाड,
चरबी आणि त्वचेचा गोळा होता. या मुलावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली. या शस्त्रक्रियेत मुलाचे उजव्या आणि डाव्या बाजूचे लिंग जोडण्यात आले. तर खालचे लिंग काढण्यात आले. याचवेळी गुद्द्वारापाशी असलेला मांसाचा गोळादेखील काढण्यात आला. आता या मुलाची प्रकृती स्थिर आहे. २५ आॅगस्ट रोजी पोटाच्या वरच्या बाजूची जागा बंद करण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच असे मूल जन्माला आले आहे. याला डेव्हलपमेंट अॅबनॉर्मलिटी म्हटले जाते.
पोटात बाळाची वाढ होत असताना रक्तपुरवठा कमी झाला, त्यात आईने घेतलेल्या औषधांचा परिणाम गर्भावर झाला असण्याची शक्यता आहे. पण, याचे नेमके कारण सांगता येत नाही. मात्र, आता हे बाळ सामान्य आयुष्य जगू शकते, असे डॉ. कोठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)