सुरेशदादा जैन यांचे जामीन अर्ज फेटाळले
By Admin | Updated: October 11, 2014 05:52 IST2014-10-11T05:52:55+5:302014-10-11T05:52:55+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी १५ दिवसांसाठी तात्पुरता जामीन मागणारा अर्ज ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केला.

सुरेशदादा जैन यांचे जामीन अर्ज फेटाळले
औरंगाबाद : जळगाव येथील घरकूल प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेशदादा जैन यांचे नियमित जामीन मागणारे दोन अर्ज आणि विधानसभा निवडणुकीसाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि टी.व्ही. नलावडे यांनी आज (शुक्रवारी) फे टाळले.
जळगाव महानगरपालिकेने राबविलेल्या घरकूल योजनेत ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आ. सुरेशदादा जैन हे आरोपी आहेत. या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी यापूर्वी वेळोवेळी दाखल केलेले जामीन अर्ज जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी रद्द केले. नियमित जामीन मिळावा, याकरिता दाखल केलेला त्यांचा अर्ज खंडपीठात प्रलंबित आहे.
दरम्यान, त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १५ दिवसांसाठी तात्पुरता जामीन मागणारा अर्ज
ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केला. या सर्व अर्जांवर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे यांच्यासमोर ८ आॅक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी पूर्ण झाली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही अर्जांवरील निर्णय राखून ठेवला होता. आज (शुक्रवारी) न्यायालयाने सुरेशदादा यांचे सर्व अर्ज फेटाळत असल्याचे जाहीर केले. या वेळी शासनाकडून सहायक सरकारी लोकअभियोक्ता जी.के. थिगळे यांनी बाजू मांडली.
(प्रतिनिधी)