शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपामध्ये
By Admin | Updated: November 9, 2014 16:31 IST2014-11-09T15:56:58+5:302014-11-09T16:31:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपामध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
व्यवसायाने चार्टड अकाऊंटन्ट सुरेश प्रभू हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. १९९६ मध्ये राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रभू हे शिवसेनेचे सदस्य असले तरी ते सक्रीय राजकारणात नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.
वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील कामकाजाचा अनुभव पाहता मोदी सुरेश प्रभूंकडे रेल्वे मंत्रालयसारखे महत्त्वपूर्ण खाते देऊ इच्छितात. याशिवाय त्यांच्या अन्य छोट्या खात्यांचा कार्यभारही दिला जाऊ शकतो. हुशार, अभ्यासू नेेते म्हणून प्रसिद्ध असलेले हे सुरेश प्रभू हे बँकींग क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ आहेत. २०१३ मध्ये व्हार्टन येथील आर्थिक विषयावरील मोदींचे व्याख्यान रद्द झाल्याच्या निषेधार्थ सुरेश प्रभू यांनीदेखील व्हार्टनमधील व्याख्यानाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. वीज, कोळसा आणि रिन्यूएबल एनर्जीच्या विकासासंबंधी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीत सल्लागारपदावरही प्रभू यांची निवड झाली होती. तसेच ब्रिस्बेनमध्ये होणा-या जी २० समुहाच्या बैठकीत मोदी यांच्यासाठी 'शेरपा' म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रभू हे मोदींच्या गुड बुक्समध्ये असल्याची चर्चा यापूर्वीच सुरु होती.