सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही नगरसेवकांना अटकपूर्व जामीन
By Admin | Updated: November 3, 2015 14:05 IST2015-11-03T14:04:25+5:302015-11-03T14:05:00+5:30
ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या चारही नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही नगरसेवकांना अटकपूर्व जामीन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या चारही नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या चौघांना हायकोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर २ डिसेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ठाण्यातील बिल्डर आणि कॉसमॉस समुहाचे प्रमूख सूरज परमार यांनी महिनाभरापूर्वी आत्महत्या केली होती. परमार यांच्या सूसाइड नोटमध्ये ठाण्यातील चौघा नगरसेवकांचे नाव होते. राजकीय नेत्यांना पैसे दिले, तरी कामे होत नव्हती, असा उल्लेखही त्यांच्या नोटमध्ये करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी नोटमध्ये उल्लेख असलेल्या चौघा नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही नगरसेवक पसार होते.
जिल्हा सत्र न्यायालयाने चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर चौघांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने चौघांनाही जामीन मंजूर केला. कोर्टाने काही अटीदेखील टाकल्या असून यानुसार चौघांनाही वर्तकनगर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पासपोर्ट आणि मोबाईल फोनही कोर्टात जमा करावा लागणार असून २ डिसेंबरपर्यंत त्यांना महापालिका आवारात प्रवेश करण्यास बंदी टाकण्यात आली आहे.