मुंबई - लातूर येथे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केली. या मारहाणीचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विजय घाडगे पाटील यांना सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी अजित पवारांचे बॅनर फाडले जात आहेत. पक्ष कार्यालयावर पत्ते उधळले जात आहेत. त्यातच या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मौन सोडले आहे. मारहाणीची घटना चुकीची असल्याचे सांगत त्यांनी घटनेचा विरोध केला परंतु मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर काय कारवाई करणार यावर बोलणे टाळले आहे.
अजित पवारांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय की, काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या असं माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो असं त्यांनी म्हटलं.
मात्र अजित पवारांनी केलेल्या पोस्टमध्ये कुठेही सूरज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यावर पक्ष कारवाई करणार की नाही याबाबत प्रश्न उभा राहिला आहे. लातूरच्या घटनेनंतर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना मुंबईत भेटायला बोलवल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांच्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं तटकरेंनी म्हटलं. मात्र सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीविरुद्ध छावा संघटना संघर्ष
दरम्यान, लातूरमधील या प्रकरणामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विजय घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर दगडफेक, जाळपोळ आणि पत्ते उधळण्याचं काम केले आहे. जालना येथे जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाला. नांदेड येथे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले तर धाराशिव येथे राष्ट्रवादी कार्यालयासमोर पत्ते उधळण्यात आले.