सूर ज्योत्स्ना पुरस्कार संगीतसाधकांचा खरा सन्मान
By Admin | Updated: March 24, 2015 01:11 IST2015-03-24T01:11:42+5:302015-03-24T01:11:42+5:30
युवा प्रतिभावान कलावंतांना देण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना पुरस्कारामुळे संगीतक्षेत्रातील लपलेले हिरे जगासमोर येतील.

सूर ज्योत्स्ना पुरस्कार संगीतसाधकांचा खरा सन्मान
गडकरी, फडणवीस यांचे गौरवोद्गार : ओजस अढिया, पूजा गायतोंडे यांचा हस्ते गौरव
नागपूर : युवा प्रतिभावान कलावंतांना देण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना पुरस्कारामुळे संगीतक्षेत्रातील लपलेले हिरे जगासमोर येतील. संगीत साधकांचा हा खरा सन्मान असून यामुळे ज्योत्स्ना दर्डा यांच्या कार्याचा नंदादीप सदैव तेवत राहील असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त द्वितीय ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ प्रदान सोहळा रविवारी नागपूर येथील चिटणीस पार्क येथे थाटात पार पडला. हजारो संगीत रसिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात प्रख्यात युवा तबलावादक ओजस अढिया व सुफी-गजल गायिका पूजा गायतोंडे यांना नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा व कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम, प्रख्यात गायक हरिहरन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम, खा. प्रफुल्ल पटेल, खा. अविनाश पांडे, खा. कृपाल तुमाने, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, माजी मंत्री अनिल देशमुख, वर्षाबेन पटेल या मान्यवरांसह लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष आशु दर्डा, शीतल दर्डा, ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी, सुनीत कोठारी, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, प्रसिद्ध गायिका सुनाली राठोड, पुरस्कार निवड समितीचे सदस्य शशी व्यास, टाईम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर, जळगावचे माजी नगराध्यक्ष रमेश जैन, रुची कलंत्री, विशाल कलंत्री, जयश्री भल्ला, कपील भल्ला, स्नेहल जालान, नॅशनल टुरिझम अॅडवायझरी काऊन्सिलचे संचालक वैकुंठ कुंभार, सन्मानचिन्हाचे शिल्पकार प्रा. संदीप पिसाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. देवेंद्र दर्डा आणि आशू दर्डा यांनी प्रास्ताविकपर भाषणातून ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रसिद्ध गायक हरिहरन व त्यांच्या ‘सोल इंडिया बॅन्ड’च्या सुरेल सादरीकरणाने ही संध्याकाळ अविस्मरणीय झाली.
संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाची प्रकाशयोजना विशाल माळोदे यांची तर ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते.
यावेळी लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य मातोश्री उषादेवी दर्डा, किशोर दर्डा, माजी आ. मधु जैन, जयेंद्रभाई शहा, किरीट भंसाली, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा, लोकमतचे प्रेसिडेन्ट (सेल्स) करुण गेरा, नॅशनल हेड (सेल्स) अजित नायर, वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष बिजॉय श्रीधर प्रामुख्याने उपस्थित होते.
हरिहरन यांच्या गीतात ‘जीव रंगला गुंगला...’
नागपूर : ज्येष्ठ गायक आणि संगीतकार हरिहरन यांचा वेदनेची अनुभूती देणारा आवाज...कातर भावनांना हळुवार हात घालणारा त्यांचा खर्जातील स्वर...गायनातील उत्कटता आणि शब्दांचा आशय व्यक्त करताना नजाकतीने घेतलेल्या लाजवाब हरकती आणि फक्त दाद देत ऐकत राहण्याचा आनंददायी अनुभव. हरिहरनचे गीत ऐकण्याचा योग म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच होती. त्यामुळेच हरिहरनच्या सादरीकरणासाठी उत्सुक असलेल्या रसिकांनी हरिहरन यांना रंगमंचावर आमंत्रित करण्यात आले तेव्हाच टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर मात्र हरिहरन यांनी लोकप्रिय गीतांना समाँ बांधला आणि रसिकांचा जीव त्यांच्या गीतात रंगला...गुंगला.
‘महावीर नमन’ सीडीचे लोकार्पण
पुरस्कार सोहळ्यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी रचलेल्या ‘महावीर नमन’ या भजन अल्बमच्या सीडीचे लोकार्पण करण्यात आले. या अल्बममध्ये गायक सुरेश वाडकर, गायिका उत्तरा केळकर, साधना सरगम, वैशाली सामंत आणि रुची कलंत्री यांनी गायन केले आहे तर दिवंगत चंद्रशेखर गाडगीळ यांचे संगीत आहे. रूपकुमार राठोड यांनी या सीडीबाबत उपस्थितांना माहिती दिली. ही सीडी केवळ जैन धर्मीयांसाठीच नव्हे तर प्रत्येक धर्माच्या लोकांना ईश्वराच्या आराधनेचा आनंद देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टाईम्स म्युझिकतर्फे या सीडीचे वितरण व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ : देवेंद्र फडणवीस
ज्योत्स्ना दर्डा यांनी समाजातील सखींना एकत्र आणले व महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद केला. एकीकडे वंचितांसाठी काम करीत असताना स्वरसाधनादेखील सुरू ठेवली. युवा संगीतसाधकांना संधी देण्यासाठी धडपड केली. आपल्या कार्यातून त्यांनी अनेक सुरेल प्रतिभावंतांना एका समान बंधनात जोडले. त्यांच्यामुळेच आज नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारप्राप्त गायक ओजस अढिया आणि पूजा गायतोंडे यांचीही भरभरून प्रशंसा केली.
ज्योत्स्ना दर्डा सच्च्या संगीतसाधक : नितीन गडकरी
अव्याहत संगीतसाधना हे एक मोठे व्रत आहे. ज्योत्स्ना दर्डा यांनी आयुष्यभर संगीताची साधना केली अन् नवीन गायकांना मंच प्रदान करण्यासाठी सदैव पुढाकार घेतला. ज्योत्स्ना दर्डा यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय नम्र व सुस्वभावी होते. त्यांनी आपुलकीतून समाजाच्या सर्वच स्तरांतील लोकांशी जिव्हाळ््याचे नाते जोडले होते. संगीतावर त्यांनी प्रेम केले. त्यांची जागा कधीच भरून निघू शकत नाही पण संगीतरुपाने त्या आजही सर्वांमध्ये आहेत, असे भावोद्गगार नितीन गडकरी यांनी यावेळी काढले. ‘महावीर नमन’च्या रचनांमधून त्यांच्या स्मृती कायम राहतील, असेही ते म्हणाले.