Supriya Sule vs Vijay Shivtare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या वेळोवेळी महाराष्ट्रचे प्रश्न लोकसभेत मांडत असतात. पण आज त्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी सुळेंचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. त्यात त्यांनी असा दावा केला की, आधी मटण खाल्लं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महादेवाचं दर्शन घेतले. मटण खाल्यानंतर भैरवनाथ मंदिर, महादेव आणि संत सोपानकाकांचे दर्शन घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळेंवर झाल्याने वाद निर्माण होईल अशी शक्यता असताना, सुप्रिया सुळेंनी यावर उत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या शिवतरेंचा काय आरोप?
शिवसेनेच्या विजय शिवतरेंनी एक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी, सुप्रिया सुळेंच्या या कृत्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं. शिवतरेंनी सुप्रिया सुळेंचा मटण खाताना व्हिडिओ, मंदिरात घेतलेले दर्शन याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट केलेत. या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंबाबत काही संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याचदरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या आरोपावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. कारण मला यासंदर्भात काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. देशात महागाई आणि बेरोजगारीवर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यावर आम्ही सारेच गेल्या अनेक दिवसांपासून आवाज उठवतोय. देशातील उत्पादकता कमी झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. कांद्याच्या नियोजनाचा अभाव मोठी गोष्ट आहे. गेल्या आठवड्यात त्याचा तोटा आपण बघितला. देशात कांद्याला भाव नाही आणि जगात कांद्याला प्रचंड मागणी होती, अशा वेळी सरकारने ठोस निर्णय घेतला असता तर चित्र वेगळं असतं. मात्र, तसे कुठलेच निर्णय झालेले नाहीत," अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले.