सुप्रिया सुळेंच्या हाती राष्ट्रवादीची सूत्रं ?
By Admin | Updated: October 7, 2016 15:58 IST2016-10-07T15:54:10+5:302016-10-07T15:58:27+5:30
राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पक्षाच्या प्रचाराची मुख्य धुरा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाती देण्यात येणार असल्याचं कळत आहे

सुप्रिया सुळेंच्या हाती राष्ट्रवादीची सूत्रं ?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - लोकसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर छगन भुजबळांची अटक आणि इतर नेत्यांचे घोटाळे यामुळे राष्ट्रवादी पक्ष अडचणीत सापडल्यासारखा झाला आहे. त्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पक्षाच्या प्रचाराची मुख्य धुरा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाती देण्यात येणार असल्याचं कळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची सर्व सूत्रे सुप्रिया सुळेंच्या हाती सोपवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळली आहे.
नेहमी मवाळ असणा-या सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांपासून अचानक आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केलेल्या सणसणीत टीका चर्चेचा विषय झाला आहे. सुत्रे हाती येणार असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची सूत्रे लवकरच त्यांच्याकडे सोपविली जाणार आहेत का, अशी राजकीय चर्चाही रंगली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुळे यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार कार्यक्रम हाती घेतले आहेत. विविध चर्चासत्र, युवा प्रवक्ते व वक्ते यांना प्रशिक्षण, नेत्यांच्या बैठका, सोशल मीडिया यासाठी सुळे यांनी कार्यक्रमच हाती घेतला आहे. संघटनात्मक कौशल्यावर भर देतानाच आता त्यांनी "राष्ट्रवादी‘च्या मुख्य प्रचारकाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे.