पोषणयुक्त आहाराचा पुरवठा करा

By Admin | Updated: July 20, 2016 01:33 IST2016-07-20T01:33:15+5:302016-07-20T01:33:15+5:30

आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांची निवासी व्यवस्था करावी तसेच रिक्त असणारी सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत

Supply nutritional supplements | पोषणयुक्त आहाराचा पुरवठा करा

पोषणयुक्त आहाराचा पुरवठा करा


घोडेगाव : आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांची निवासी व्यवस्था करावी तसेच रिक्त असणारी सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य इतर सुविधा गुणवत्तापुर्ण असाव्यात, त्यांना पोषणयुक्त व दर्जायुक्त आहाराचा पुरवठा केला जावा,आश्रमशाळांमध्ये सुरू असलेले भगवेकरणयुक्त कार्यक्रम थांबवावेत आदी ठराव आदिवासी आश्रमशाळा संवाद परिषदेत करण्यात आले.
घोडेगाव येथे आदिवासी आश्रमशाळा कृती समिती पुणे जिल्हा यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. आदिवासींच्या शिक्षणात अत्यंत महत्वाची भुमिका बजाविणा-या आश्रमशाळेच्या प्रश्नांवर या परिषदेत सखोल चर्चा झाली. त्याचे उद्घाटन डॉ.दिलीप बांबळे यांनी केले. समारोपास जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य उपस्थित होते.
या परिषदेत आश्रमशाळेच्या प्रश्नांसंबधीचे ठराव व कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. यामध्ये आहार पुरवण्यासाठी कायमस्वरूपी व पारदर्शक यंत्रणा असावी, आश्रमशाळेंचे दरवर्षी तज्ञ संस्थांमार्फत मुल्यमापन केले जावे, आश्रमशाळेतील संरक्षण व्यवस्था सक्षम करण्यात यावी, आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, इयत्ता ८ वी ते १० वी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांची सोय तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावी, आश्रमशाळांतील कंत्राटी कर्मचा-यांना तात्काळ सेवेत कायम करावे यांचा त्यात समावेश होता.
पुणे जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेवर कविता वरे यांनी केलेल्या अभ्यासाच्या अहवालाचे प्रकाशान यावेळी डॉ.इंद्रजित जाधव, डॉ.बहुले सर, शरद जावळेकर, विजय आढारी, डॉ.पुरूषोत्तम काळे, बाळासाहेब कानडे, जी.डी.शिंदे इत्यादी उपस्थित होते. या अहवालावर परिषदेत सखोल चर्चा झाली.
दुस-या सत्रात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी यांनी आश्रमशाळेंच्या प्रश्नांवर आपली मते मांडली.
यावेळी शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे व पीएचडी मिळाल्याबद्दल हनुमंत भवारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू घोडे यांनी केले. ठरावाची मांडणी किरण लोहकरे यांनी केली. आभार अविनाश गवारी यांनी मानले.
आश्रमशाळेतील निवासी शिक्षकांची उपलब्धता, आहार व शैक्षणिक साधनांची गुणवत्ता, शिक्षक भरती व प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची गळती, विद्यार्थ्यांसाठी संरक्षण व्यवस्था, कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न व इतर प्रश्वांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. समारोप सत्रासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत कुदळे हेही उपस्थित होते. आदिवासी आज, काल व उद्या या अमोल वाघमारे यांनी संपादीत केलेल्या पुस्तकाचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले.
आश्रमशाळांमध्ये आदिवासी कांत्रीकारक, आदिवासी साहित्यिक यांचे समग्र साहित्य उपलब्ध करून दिले जावे, आश्रमशाळांना आदिवासी क्रांतीकारकांची नावे देण्यात यावीत असे ठराव करण्यात आले व या सर्व ठरावांची परिपूर्ती करण्यासाठी आदिवासी आश्रमशाळा हक्क संवाद परिषद एकजुटीने प्रकल्प अधिकारी यांच्याकडे प्रयत्न करतील असा निश्चय करण्यात आला.

Web Title: Supply nutritional supplements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.