पोलीस अधीक्षक आरती सिंग बचावल्या

By Admin | Updated: August 19, 2014 00:53 IST2014-08-19T00:53:08+5:302014-08-19T00:53:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौदा येथील सभेच्या बंदोबस्ताची तयारी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांच्या काफिल्यातील पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या वाहनाला अपघात झाला.

Superintendent of Police Aarti Singh escaped | पोलीस अधीक्षक आरती सिंग बचावल्या

पोलीस अधीक्षक आरती सिंग बचावल्या

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौदा येथील सभेच्या बंदोबस्ताची तयारी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांच्या काफिल्यातील पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या वाहनाला अपघात झाला. मागच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे डॉ. सिंग आणि त्यांच्या वाहनातील कर्मचारी बालंबाल बचावले.
पंतप्रधान मोदी यांच्या मौदा येथील कार्यक्रमस्थळावरच्या बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिल्लीहून विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीजी) वरिष्ठ अधिकारी नागपुरात आले आहेत. डीआयजी श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी तसेच गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी आज एकत्रित झाले. या सर्वांच्या वाहनांचा काफिला आज दुपारी नागपूरहून मौद्याकडे निघाला. गुमथळा गावाहून पुढे निघाल्यानंतर पार्किंग स्थळ दाखविण्यासाठी अचानक समोरच्या वाहनातील अधिकाऱ्याने चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यामुळे वाहनचालकाने करकचून ब्रेक मारले.
मोठा अनर्थ टळला
ध्यानीमनी नसताना अचानक समोरचे वाहन थांबल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या वाहनचालकानेही ब्रेक दाबले. मात्र, कारची गती जास्त असल्यामुळे समोरच्या वाहनावर डॉ. सिंग यांचे वाहन आदळले. या अपघातामुळे दोन्ही वाहनांच्या संबंधित भागाचे नुकसान झाले. डॉ. सिंग यांच्या वाहनांमागे असलेल्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या खाली वाहन उतरविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. डॉ. सिंग आणि त्यांच्या वाहनातील कर्मचाऱ्यांना जुजबी दुखापत झाली.
मौद्यात दोन हजार पोलीस
पंतप्रधान मोदी यांच्या मौदा येथील कार्यक्रमाचा बंदोबस्त करण्यासाठी १८०० पोलीस कर्मचारी आणि २०० अधिकारी तैनात केले जाणार आहे. यापैकी ८०० पोलीस कर्मचारी नागपूर ग्रामीणचे राहणार असून, १००० कर्मचारी बाहेरून येणार आहे. याशिवाय एसपीजींची १२ ते १५ अधिकाऱ्यांची आणि एसपीयूंची सुमारे २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची चमू पंतप्रधानांभोवती सुरक्षेचे कडे उभारणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Superintendent of Police Aarti Singh escaped