प्रचाराचा सुपर संडे
By Admin | Updated: October 13, 2014 01:26 IST2014-10-13T01:26:41+5:302014-10-13T01:26:41+5:30
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार असून, छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आजचा दिवस प्रचारासाठी ‘सुपर संडे’ ठरला.

प्रचाराचा सुपर संडे
जाहीर प्रचार आज थांबणार : छुपा सुरू होणार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार असून, छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आजचा दिवस प्रचारासाठी ‘सुपर संडे’ ठरला. विविध पक्षांच्या सभा, सिनेनट आणि नट्यांच्या ‘रोड शो’ने दिवस गाजला.
१२ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले. २ आॅक्टोबरपासून प्रचाराला गती आली. जिल्ह्यातील १२ जागांसाठी २११ उमेदवार रिंगणात आहेत. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे लढत असल्याने सर्वत्र बहुरंगी लढतीचे चित्र आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बहुजन समाज पार्टीसह इतरही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.
प्रचारासाठी कमी दिवस असतानाही सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्कावर भर देऊन जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या नेत्या मायावती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तारिक अन्वर यांच्यासह सर्वच पक्षाच्या इतरही नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.
चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रीही प्रचारात उतरल्या. प्रचाराच्या काळातील आजचा अखेरचा रविवार उमेदवारांसाठी ‘सुपर संडे’ ठरला. सुटीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा मतदारांशी सपंर्क साधण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. बच्चेकंपनीही प्रचार यात्रेत सहभागी झाली होती. आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार तोफा शांत होतील. त्यामुळे प्रचाराच्या समारोपाला प्रत्येक मतदारसघांत महारॅली काढण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. यातून शक्तिप्रदर्शन करण्याचाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. (प्रतिनिधी)