सायन्ना रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी
By Admin | Updated: March 2, 2017 03:43 IST2017-03-02T03:43:27+5:302017-03-02T03:43:27+5:30
ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी

सायन्ना रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी
ठाणे : केवळ ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा सर्वसाधारण रु ग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल) रूपांतर सुपर स्पेशालिटी रु ग्णालयात होणार आहे. या ठिकाणी ५५० खाटांचे इंटिग्रेटेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. सध्या असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागीच सुपर स्पेशालिटी रु ग्णालय होणार असून बांधकामासाठी १६८ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.
ठाण्यातील जनतेला माफक दरात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. आमदार प्रताप सरनाईक यांनीही यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडला होता. बुधवारी यासंदर्भात सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित केली होती. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखांब, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बी.डी. पवार, उपसंचालक डॉ. रत्ना रातखंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्याकरिता ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयाचे कामगार रु ग्णालय येथे तात्पुरते स्थलांतरित करणार आहे. (प्रतिनिधी)
>५५० वाढीव खाटा
व्यवहार्यता तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
४५० नियमित आणि १०० सुपर स्पेशालिटी असे एकूण ५५० वाढीव खाटांचे असे हे रु ग्णालय असणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.