सुनेने केला अंध सासऱ्याचा खून
By Admin | Updated: July 15, 2014 01:16 IST2014-07-15T01:16:36+5:302014-07-15T01:16:36+5:30
अंध सासऱ्याचे पालनपोषण करणे जीवावर आल्याने सुनेने चक्क सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडली.

सुनेने केला अंध सासऱ्याचा खून
कुऱ्हाडीचे घाव : दररोजच्या कटकटींमुळे सासऱ्याचे पालनपोषण करणे आले होते जीवावर
ढाणकी (यवतमाळ) : अंध सासऱ्याचे पालनपोषण करणे जीवावर आल्याने सुनेने चक्क सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडली. वसराम धनसिंग राठोड (७०) असे मृताचे नाव आहे.
दोन्ही डोळ्यांनी अंध आणि वृद्ध असलेल्या सासऱ्याचे पालनपोषण करणे सून पंचफुला गणेश राठोड हिच्या जीवावर येत होते. नेहमी यावरून परिवारात खटके उडत. सासरा आणि सुनेतही नेहमी याच विषयावरून भांडण होत होते. रविवारी सायंकाळी याच कारणावरून सासरा आणि सुनेत ठिणगी पडली. काही कळायच्या आत पंचफुलाने घरातील कुऱ्हाड आणली आणि अंध सासऱ्याच्या गळ्यावर वार केला. आधीच क्षीण असलेला सासरा वसराम राठोड जागीच गतप्राण झाला. या घटनेचे वृत्त गावात समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपी पंचफुला हिला पकडून एका खांबाला बांधून ठेवले. या घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचफुलाला अटक करून तिच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नारळी तांडा येथे गणेश राठोड हा पत्नी व वडिलांसह राहतो. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र गणेशची पत्नी अत्यंत रागीट स्वभावाची आणि शीघ्रकोपी आहे. या रागाच्या भरातच तिने अंध सासऱ्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)