रविवारचा ‘ड्राय डे’ रद्द !
By Admin | Updated: February 18, 2017 04:48 IST2017-02-18T04:48:37+5:302017-02-18T04:48:37+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ ते २१ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीला निकालाच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने

रविवारचा ‘ड्राय डे’ रद्द !
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ ते २१ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीला निकालाच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घातलेली दारूबंदी शिथिल करत उच्च न्यायालयाने १९ फेब्रुवारी रोजीचा ‘ड्राय डे’ रद्द केला. तसेच २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस दारूबंदी न लागू करता केवळ निकालापर्यंत दारूबंदी लागू राहील, असेही उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून १९ ते २१ फेब्रुवारी व निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी दारूबंदी केली. सरकारच्या या परिपत्रकाला ठाणे येथील हॉटेल्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासूनच (१९ फेब्रुवारीपासून) दारूबंदी करण्याची आवश्यकता नाही. तसेच निकालाच्या दिवशीही (२३ फेब्रुवारी) पूर्ण दिवस दारूबंदी करणे गरजेचे नाही, असे मत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. ‘दारूबंदीच्या आधीच मद्याचा साठा करण्याइतपत राजकीय नेते हुशार आहेत,’ अशी टिप्पणीही खंडपीठाने सुनावणीवेळी
केली. (प्रतिनिधी)