रविवार गारठला
By Admin | Updated: October 27, 2014 00:35 IST2014-10-27T00:35:34+5:302014-10-27T00:35:34+5:30
साधारणत: दिवाळीच्या सुमारास उपराजधानीत गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. परंतु अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला असून सलग दुसऱ्या दिवशी बोचरी थंडी अनुभवायला मिळाली.

रविवार गारठला
उपराजधानीत थंडीची चाहूल : स्वेटर्स, मफलर्स निघाले बाहेर
नागपूर : साधारणत: दिवाळीच्या सुमारास उपराजधानीत गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. परंतु अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला असून सलग दुसऱ्या दिवशी बोचरी थंडी अनुभवायला मिळाली. ‘आॅक्टोबर हिट’चा सामना करणारे नागरिक रविवारी दुपारी चक्क स्वेटर्स घालून फिरताना दिसून आले. हिवाळ््याची चाहूल लागली असली तरी अरबी समुद्रातील घडामोडींमुळे तापमानात ६ अंशांहून अधिक घसरण दिसून आल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दिवाळीच्या अगोदर नागपुरात दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत होते. पण अरबी समुद्रातील वादळाने वातावरणच बदलवले. शनिवारप्रमाणे रविवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास काही भागात पावसाचा शिडकावा पडल्याने थंडी आणखी जाणवून येत होती. रविवारी उपराजधानीत कमाल २६.६ अंश सेल्सिअस तर किमान १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कमाल तापमानात सरासरीहून चक्क ६ अंशांनी घसरण झाली आहे. पुढील दोन दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
‘कूल संडे’चा माहौल
उपराजधानीत सगळीकडेच दिवाळीची रौनक असताना थंडगार वातावरण झाल्यामुळे नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. अनेकांनी निरनिराळ््या पिकनिक स्पॉटकडे धाव घेतली तर काहींनी घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन फुटाळा, ट्रॅफीक पार्क यासारखी ठिकाणे पालथी घातली. सायंकाळच्या सुमारास पावसाचा शिडकावा आल्याने घराबाहेर पडलेल्यांची काही वेळ तारांबळ उडाली. विशेषत: तरुणाई अन् बच्चे कंपनीने ‘कूल संडे’चा मनमुराद आनंद लुटला. आतापर्यंत बाहेर न निघालेले स्वेटर, जॅकेट थंडी अन् पावसाच्या निमित्ताने अनेक जण अंगात घालून फिरताना दिसून आले.